आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून दुचाकीवर पळून जाणाऱ्या दोन भामट्यांना एका कामगाराने झडप घालून पकडले. चोरट्यांनी त्या तरुणाला साधारण ५० फूट फरफटत नेले, मात्र हार न मानता त्या तरुणाने दोन्ही चोरांना खेचून दुचाकीवरून खाली पाडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी ईश्वर जनार्दन खरात (२१, रा. राम मंदिरजवळ रांजणगाव) व रितेश विजय दिपके (२०, रा. नर्सरी कॉलनी, रांजणगाव) यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
वाळूज औद्योगिक परिसरात २ मे रोजी सायंकाळी बालाजी जाधव (३०, रा. वडगाव) हे मोबाइलवर बाेलत पायी जात होते. त्याचवेळी लाल रंगाच्या विनाक्रमांक दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने जाधव यांच्या हाताला झटका देऊन त्यांचा मोबाइल हिसकावला. याच दोघांनी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास शिवरणा चौकातून मोबाइलवर बोलत जाणाऱ्या सूरज मच्छिंद्र गोजिरे (१५) या विद्यार्थ्याचा मोबाइलही हिसकावून पळ काढला.
पुढे मेटलमॅन कंपनीसमोरून घराकडे परतणाऱ्या पवन रामभाऊ तुपे (२३) या कामगाराच्या हातातून मोबाइल हिसकावत जय भवानी चौकाच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी पवन व त्याच्या मित्राने दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्यासाठी जय भवानी चौकाच्या दिशेने धाव घेतली.
या दोन चोरट्यांनी जय भवानी चौक येथून मोबाइलवर बोलत जाणाऱ्या तरुणाच्या जवळ गाडी नेत त्याच्या हातातून मोबाइल हिसकावला. पण या तरुण कामगाराने मागे बसलेल्या चोरट्याला पकडले. दुचाकीस्वाराने स्पीड वाढवली, त्यामुळे मागच्या चोराला पकडून ठेवणारा तरुण खाली पडला. चोरांनी त्याला दुचाकीने ५० फूट फरफटत नेले. पण हिंमत न हारता त्या तरुणाने दोघा भामट्यांना दुचाकीसह खाली पाडले.
हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी जमली. कुणीतरी वाळूज एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर फौजदार सचिन शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांना पाहताच त्यातील एका चोराने त्यांचे नाव घेत ओळख दाखवली. पण शिंदे यांनी चोरांना पकडून देणाऱ्या जखमी कामगारास निघून जाण्यास सांगितले. नंतर पोलिसांनी आरोपींना ठाण्यात आणले पण जखमी कामगार फिर्याद देणार असेल तरच गुन्हा दाखल होईल, अशी भूमिका घेतली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.