आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद पुन्हा हादरले:हिमायतबागेत डिझेल टाकून तरुणाला जाळले, राहुलनगरात खलबत्त्याने पत्नीचे डोके ठेचले

प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. शनिवारी मध्यरात्री दीड वाजता अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत पोत्यात टाकून अज्ञात लोकांनी हिमायतबागेत आणून टाकले. त्यानंतर पोत्यात तसेच ठेवून त्यावर डिझेल टाकून जाळून टाकले. जवळच असलेल्या फार्महाऊसवरील कर्मचारी पाणी पिण्यासाठी उठला असता त्याने हा प्रकार पाहून पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल केला. गस्तीवरील पोलिस आले तेव्हा मृतदेह जळत होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्या तरुणाची तसेच मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते.

दुसऱ्या घटनेत राहुलनगरात चारित्र्यावर संशय घेत पतीने खलबत्त्याने पत्नीचे डोके ठेचून नि्घृण हत्या केली. गेल्या महिनाभरात १४ जणांचे खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.

हिमायतबाग परिसरात लच्छू पहिलवान यांचे बाखरिया फार्म हाऊस आहे. तेथे काम करणारा मुलगा आकाश शेषराव बनकर हा पाणी पिण्यासाठी उठला होता. तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी आग लागलेली दिसली. तोजवळ गेला तेव्हा एक व्यक्ती जळत असल्याचे पाहून तो घाबरला. त्याने तत्काळ नियंत्रण कक्षाला कॉल केला. तोपर्यंत आसपासचे काही नागरिक जमा झाले. नियंत्रण कक्षाने तत्काळ वायरलेस संदेश पाठवला. गस्तीवर असलेले हवालदार गणेश गायकवाड, श्रीकांत राठोड यांना दिल्ली गेट जवळ एका व्यक्तीस कोणीतरी आग लावलेली असून शरीर अद्यापही जळत आहे, तत्काळ जा, असा संदेश मिळाला. टाऊन हॉल येथून दिल्ली गेट मार्गे ते हिमायतबागेकडे रवाना झाले. फार्महाऊस आत असल्याने बनकर त्यांना उद्धवराव चौकात घेण्यासाठी गेला. त्याच्या मदतीने पोलिस डोंगराच्या पायथ्याला पोहोचले. त्यांनी तत्काळ बेगमपुऱ्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त अशोक थोरात, पोतदार, उपनिरीक्षक विनोद भालेराव, ज्योती गात, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सात महिन्यांपूर्वी कृष्णा जाधव याचीदेखील याच बागेत क्रूर हत्या करण्यात आली होती.

दोन ते तीन लिटर डिझेल वापरल्याचा संशय

गायकवाड आणि राठोड घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत मृतदेह जळत होता. आगीची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण मृतदेह जळून खाक झाला. पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देऊन जवळच्या वस्तीवरून पाणी आणून आग विझविली. घाटी रुग्णालयात नेल्यानंतर डोक्याला मोठी जखम असल्याचे दिसून आले. एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत कोंबून तरुणाला येथे आणून टाकले होते. ते पोतेदेखील अर्धवट जळाले. दोन ते तीन लिटर डिझेल टाकून जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अन् त्याने जिवंत असल्याचा फोटो पोलिसांना पाठवला

रविवारी सकाळी हा मृतदेह गणेश नामक रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा असल्याचे वाटले. त्यादृष्टीने तपास सुरू झाला. त्याच्या भावानेदेखील तो गणेशच असल्याचे सांगितले. मात्र, तो सिल्लोडला असल्याचे स्पष्ट झाले. त्याने स्वत: जिवंत असल्याचे फोटो पोलिसांना पाठवल्यानंतर नव्याने ओळख पटवण्याचे काम सुरू झाले.

बेगमपुरा पोलिसांनी जप्त केले सीसीटीव्हीचे ३ डीव्हीआर

निरीक्षक पोतदार यांची दोन पथके तत्काळ मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रवाना झाली. त्यासोबतच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, अमोल म्हस्के यांचे पथक रविवारी रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्हीचे तीन डीव्हीआर बेगमपुरा पोलिसांनी जप्त केले. त्यापैकी एकात एक मोपेड दुचाकी जाताना कैद झाली.

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून मच्छिंद्र पिराजी पिट्टेकर (५५) याने त्याची पत्नी बिल्कीस ऊर्फ मीना मच्छिंद्र पिट्टेकर (५०) हिचा स्वयंपाकघरातील दगडी खलबत्त्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली. रेल्वेस्टेशन येथील राहुलनगरात रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला. काही वर्षांपूर्वीच त्यांनी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. शनिवारी रात्री बिल्कीसच्या जवळच राहणारी मुलगी वाद सोडवून घरी गेली होती. त्यानंतर मच्छिंद्रने खून करून मोबाइल घरीच ठेवून फरार झाला.

नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील मच्छिंद्र कामासाठी औरंगाबादेत आला होता. हॉटेलवर काम करणाऱ्या बिल्कीससोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. बिल्कीसच्या पहिल्या पतीचे निधन झाले होेते. पहिल्या पतीपासून एक मुलगी तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी, एक मुलगा आहे. त्यापैकी एक राहुलनगरमध्येच राहते. मच्छिंद्र गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन तो पत्नीला मारहाण करायचा. सतत चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी रात्री कामावरून आल्यानंतर त्याने पुन्हा बिल्कीससोबत वाद घातला. मुलीने त्यांचे वाद सोडवले. त्यानंतर रात्रीतून मच्छिंद्रने दगडी खलबत्ता आणून बिल्कीसचे डोके ठेचले.

मुलीला वाटले आई कामावर गेली असेल

रविवारी सकाळी बिल्कीसची मुलगी कामावर जाण्यासाठी घरी आली. तेव्हा कुलूप पाहुन आई कामावर गेली असेल असे वाटले. त्यामुळे ती गेली. परंतु कामावर आई आलीच नसल्याने तिने घरी धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने कुलूप तोडले असता मृतदेह समोर दिसला. सकाळी ९ वाजता घटना कळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक सर्जेराव सानप, शंकर शिरसाठ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन पथके आरोपीच्या शोधासाठी शहराबाहेर रवाना झाले.

बातम्या आणखी आहेत...