आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरगांबादकरांना मोठा दिलासा:दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शून्यावर; कमी लसीकरणामुळे निर्बंध मात्र कायम राहणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण औरंगाबादेत आढळला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत तीन लाटा आल्या अन‌् गेल्या. यात ३,७३२ जणांचा मृत्यूही झाला. पण रुग्णसंख्या कधीही शून्यापर्यंत आली नव्हती. आता तब्बल ७३६ दिवसांनी म्हणजे २१ मार्च २०२२ रोजी जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य यंत्रणेसह सर्वांसाठी हा सुदिन ठरला.

विशेष म्हणजे गेल्या १९ दिवसांत कोरोनाच्या मृत्यूवरही जिल्ह्याने मात केली. कारण २ मार्च २०२२ पासून एकाही बळीची नोंद झाली नव्हती. दरम्यान, रुग्ण संख्या शून्यावर पोहोचली तरी कोरोना संपलेला नाही. शासनाच्या निकषानुसार ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस व ७० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतल्याशिवाय आपण महामारीपासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकत नाही. जिल्ह्याने ही अट पूर्ण केलेली नसल्याने काही निर्बंध कायम आहेत. सध्या एकूण रुग्णसंख्या १,६९,७४१ झाली आहे. त्यापैकी बहुतांश लोक बरे झाले. सध्या केवळ २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना चिंता लसीकरणाची
रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी लसीकरण अपेक्षित वेगाने होत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण चिंतेत आहेत. सोमवारी टास्क फोर्सची बैठक झाली. त्यामध्ये घाटी, मनपाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी लसीकरण वाढवण्यासाठी आता लोकप्रतिनिधींची मदत घेण्याचे ठरले. चव्हाण यांनी सांगितले की, ९० टक्के लोकांनी पहिला आणि ७० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतल्याशिवाय निर्बंध हटणार नाहीत. त्यामुळे विधिमंडळ, लोकसभेच्या अधिवेशनानंतर सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, इतर नेत्यांची मदत घेऊन जनजागृती केली जाईल. वॉर्ड, आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणाची आकडेवारी, स्थिती लोकांना समजून सांगणार आहोत.

आता रुग्णसंख्या नव्हे तर दुसरा डोस न घेणाऱ्यांची मोठी संख्या हीच आमची चिंता आहे. परदेशात चौथ्या लाटेची स्थिती आणि लस न घेणाऱ्यांचे मृत्यू कसे होत आहेत, हे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्याचे भान ठेवून वेगात, अधिकाधिक लसीकरणावर आमचा भर आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

आणखी १२ टक्क्यांची गरज
निर्बंध लावूनही शहर व जिल्ह्यात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आतापर्यंत केवळ ५८ टक्के लोकांनीच दुसरा डोस घेतला आहे. त्यात आणखी बारा टक्के वाढ झाली तरच जिल्हा, शहर निर्बंधमुक्त होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...