आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:जिल्हा परिषद शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा; सेंद्रिय केक अन् निसर्ग सानिध्यात फुग्यांची सजावट, वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संगोपन व संवर्धनाचा संदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजवर आपण आपल्या घरात छोट्यांचा तर कधी मोठ्यांचा वाढदिवस हौसेने साजरा करतो. पार्टी करतो आवडती भेट वस्तू, त्या वाढदिवसासाठी सजावट आणि नवीन कपडे अशी भरगच्च खरेदीही होते. असाच थोडा आगळा-वेगळा वाढदिवस जिल्हा परिषद शाळेतील झाडांचाही बुधवारी ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यानिमित्त खास मंडप सजला, फुलांची आरास, रांगोळी सजल्या, सजावटही झाली, केकही आला, औक्षण करायचे ताटही भरले, मित्रमंडळी, पाहुणे-रावळेही जमा झाले अन धूमधडाक्यात मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा झाला. सहभागी होणाऱ्यांना आधी आश्चर्यच वाटले होते. कारण सजावट पाहून शाळेतील कुणाचा वाढदिवस असावा.

पण हा वाढदिवस कोण्या राजकीय नेत्यांचा किंवा कार्यकर्त्याचा नव्हता...तर तो होता, झाडांचा! वर्षभरापूर्वी लावलेल्या रोपट्याच्या घनदाट झाडांचा! पावसाळा आल्यावर एरव्ही सगळीकडेच वृक्षलागवड कार्यक्रम सुरू असतात. पण अशा पद्धतीने शाळांत वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संगोपन व संवर्धनही गरजेचे असल्याचा महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यासाठी थेट ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाडांचाच पहिला वाढदिवस साजरा करणारा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा झाला. मुख्याध्यापक महेश लबडे यांनी सांगितले की, वृक्षारोपनाबरोबरच वृक्षसंवर्धन ही आपली जबाबदारी आहे. हा संदेश देण्यासाठी आगळा-वेगळा उपक्रम घेण्यात आला. आता दरवर्षी हा उपक्रम घेणार आहोत.

मागील वर्षी २५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद, वन विभाग, इकोसत्व, ग्राइंड मास्टर, व कारपे आदी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्ती या दोन्ही शाळांत प्रत्येकी २००० चौरस फुटांत ६०० पेक्षा अधिक देशी वनस्पतींची मियावाकी घनवन पद्धतीने लागवड झाली होती. या विशिष्ट तांत्रिक पद्धतीने लागवड झाल्याने व यशस्वीरीत्या संगोपन झाल्याने एका वर्षात झाडांची उंची २० फुटांपर्यंत पोहोचली असून अत्यंत घनदाट जंगल तयार झाले आहे. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल पुदाट, इकोसत्व व कारपे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा झरिन, ग्राइंड मास्टर कंपनीचे व्यवस्थापक महेश सहस्रबुद्धे, केंद्रप्रमुख मनोजकुमार सरग, शिक्षक सेना तालुकाप्रमुख अमोल एरंडे, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, यांच्यासह लोहगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

नदीकाठ वस्ती शाळेचे लबडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक ब्रह्मगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक कैलास मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. तर केंद्रप्रमुख मनोजकुमार सरग यांनी आभार मानले. झाडांसाठीही सजला सेंद्रिय खतांचा केक! वाढदिवस हा झाडांचा असल्याने त्यांनाही आनंदाने खाता आला पाहिजे, असा सेंद्रिय खतांचा केक सहशिक्षक रवी केदारे यांनी बनविला,जो या कार्यक्रमाच्या पाहुण्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरला. झाडांप्रती शिक्षकांमध्ये असलेली संवेदनशीलता व आत्मीयता यातून प्रतीत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...