आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​खंडपीठात सुनावणी:जिल्हा परिषदेने 40 कोटींच्या इमारतीचा ठेका देताना पायदळी तुडवल्या 5 अटी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेने ४० कोटी रुपये खर्चून नवी प्रशासकीय इमारत बांधण्याचा ठेका एन.के. कन्स्ट्रक्शनला दिला. एलोरा कन्स्ट्रक्शन्सची निविदा नाकारण्यात आली. एनकेला ठेका देताना ५ अटी पायदळी तुडवण्यात आल्या. शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यीय समितीने तयार केलेल्या अहवालातच ही बाब उघड झाली. हा अहवाल न्यायालयासमोर सादर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. अपात्र ठेकेदारांना पात्र करून संगनमताने निविदा भरल्याने जिल्हा परिषदेचे सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले. त्यावर ७ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अतिरिक्त मुख्य सचिव गृह खाते, ग्रामविकास सचिवांनी म्हणणे मांडावे. तसे झाले नाही तर त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. घोडके यांचे असेही म्हणणे होते की, निविदा मंजूर करताना ग्रामविकास राज्यमंत्री असलेले आणि आताचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आहे.

प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यावर ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी ८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीचा पाच पानी अहवाल घोडके यांनी माहितीच्या अधिकारात मिळवला. त्यात काही अटींकडे दुर्लक्ष झाल्याचे म्हटले आहे.

डोळेझाक करून एनके कन्स्ट्रक्शन्सला झुकते माप { एनके कन्स्ट्रक्शनने नियुक्त केलेल्या तांत्रिक कर्मचारी वर्गाचा व्यवसाय कर भरल्याचा पुरावा निविदेसोबत जोडला नाही. निविदा समितीने त्याची खातरजमाही केली नाही. { एलोरा आणि एनके कन्स्ट्रक्शन्सने कर्मचाऱ्यांचा व्यवसाय कर भरला नाही, याकडे तांत्रिक छाननी करतानाही डोळेझाक करण्यात आली आहे. { दोन्ही ठेकेदारांनी एचडीएफसी, एनकेजीएसबी सहकारी बँकेच्या प्रमाणपत्रावर तारीखच नोंदवलेली नाही. { इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आयआयओएमएस) या संस्थेकडे काम केल्याचे प्रमाणपत्र ‘एनके’ने जोडले. पण ही संस्था खासगी असल्याने आयआयओएमएससाठी केलेल्या ४३ कोटी ७२ लाखांच्या कामाचे मूल्य तपासणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे झालेले नाही. { एनके आणि एलोराने निविदेत पुण्यात केलेल्या एकमेकांच्या कामांचे प्रमाणपत्र जोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...