आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्मा, फुगडी खेळातून महागाईने वेधले लक्ष:मंगळागौरी म्हणाल्या, 'बुस्टर डोस टाळू नका, स्वस्थ रहा मस्त रहा…'

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झिम्मा, फुगडी खेळातून मराठी संस्कृतीचा वारसा जपणारा मंगळागौरी सण यंदा उत्साहात साजरा करण्यात आला. ‘बुस्टर डोस टाळू नका, स्वस्थ रहा मस्त रहा' म्हणत वैष्णवी गटाने लसीकरणाचे आवाहन केले. यात मनोरंजन तर करण्यात आलेच शिवाय सामाजिक संदेशही देण्यात आला. यावेळी सुपरडुपर हिट ठरलेल्या पुष्पा मधील ‘तेरी झलक अशरफी’ गाण्याने धमाल उडवून दिली. कामगार चौकातील पालखी हॉटेलमध्ये वैष्णवी गटाच्या पहिली मंगळागौरचे सादरीकरण झाले.

'घागर घुमू दे घुमू दे..रामा पावा वाजू दे' म्हणत सर्वांनी घागरी घेत केलेले नृत्याला यावेळी दाद मिळाली. तर नाच गं घुमा कशी मी नाचू… या गाण्यावर गटाच्या कलावंतांसह इतर महिलाही उत्साहाने सहभागी झाल्या. बैठी फुगडी, फुगडी, तिघींची फुगडी, काेंबडा अशा वैविध्यपुर्ण खेळांसह संदेश देणारी गाणी लक्षणीय ठरली. प्रत्येक सादरीकरणात काही ना काही संदेश गुंफण्यात आला होता.

दांडगा उत्साह

यामध्ये आरती पाठक, पूजा कुलकर्णी, रत्ना खनाळे, प्रिया कुलकर्णी, सारिका वाटेगावकर, सुजाता नाईक यांचा सादरीकरणात सहभाग होता. तर स्वाती कुलकर्णी, स्वप्ना कार्लेकर यांनी गायन, भावना कुडे हिने निवेदन आणि रमाकांत शेजूळ यांनी ढोलकीवर साथ दिली. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सादरीकरण झाले. त्यामुळे आयोजक आणि सादरकर्ते दोघांचाही उत्साह दांडगा होता.

महागाईकडे वेधले लक्ष

महागाई वाढते याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होतो. याचाच विचार करुन भाजी, गॅस, वीज, पेट्रोल यांच्या वाढत्या किंमतीवर कलावंतांनी लक्ष वेधले. महागाई रोखणे आापल्या हाती नाही, पण कुटूंबाची घडी बसवण्यासाठी अनेक ठिकाणी बारकाई केल्यास आपण महागाईतही चांगला संसार करु शकतो, असा संदेश यातून वैष्णवी गटाने दिला.

पारंपरिक गीतांच्या चालींना प्रश्नांचा साज

या सादरीकरणात पारंपरिक गीतांच्या चाली ठेवून आजच्या आधूनिक काळातील प्रश्न आम्ही मांडले. यामुळे खेळ, वारसा जपणे, मनोरंजन करणे यासोबतच आजच्या प्रश्नांवर उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडणे असा आमचा उद्देश आहे. सादरीकरणानंतर जेव्हा लोक फिडबॅक देतात तेव्हा आम्ही पेरलेल्या संदेशांचा आर्वजून उल्लेख होतो, ही बाब आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. अशी प्रतिक्रिया भावना कुडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...