आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष तोडले:हायवेलगतची 10 हजार झाडे तोडली; कामानंतर लावलेली झाडे गेली कुठे

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कर्नाटक सीमेपर्यंतच्या शंभर किलोमीटर चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले. अनेक ठिकाणी उड्डाणपुल व भुयारी मार्गाचे काम अर्धवट आहे. तरीही तलमोड व फुलवाडीच्या टोल नाक्यावर वसुली सुरू आहे. चौपदरीकरण ठेकेदार एसटीपीएल कंपनीने काम सुरू करताना दहा हजाराहून अधिक वृक्ष तोडले. मात्र, पुन्हा किती झाडे लावली, जगली किती, दुभाजकात लावलेल्या शोभेच्या झाडांची अवस्था काय आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत रस्ता चौपदरीकरणासाठी १० हजार ७५७ विविध प्रकारची विशाल झाडे तोडल्याचे समजते. आजपर्यंत रस्त्याच्या बाजूने २३ हजार ६९० झाडे तर रस्त्याच्या मध्यभागी ४२ हजार ५९२ झाडे लावल्याची महामार्ग प्राधिकरणाने माहिती दिली आहे. झाडांच्या कागदावरील नोंदी खऱ्या असतील. मात्र, प्रत्यक्षात लावलेल्या झाडांचे संगोपन झाले का, हे पाहिल्यास यात मोठी तफावत दिसते. उमरगा भागात रस्त्याच्या बाजूने झाडे लावण्यात आले. मात्र त्यांची देखरेख होऊ शकली नाही, झाडे वाळून गेली आहेत.

सध्या नुसत्या वेळूच्या काठ्या उभ्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू होण्यापूर्वी वृक्ष तोडीनंतर व्यापक वृक्ष लागवडीचा शब्द दिला होता. लिंब, पिंपळ, वडासारखी ६० वर्षांची झाडे तोडण्यात आली. तसेच काम अर्धवट असतानाही टोलनाके सुरू केले. सोलापूर-कर्नाटक सीमेपर्यंत एकूण ८२.९५ टक्के रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण असून अर्धवट चौपदरीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती.

चौपदरीकराचे डांबरीकरण झाले तरी राष्ट्रीय महामार्गावर अनेक अडथळे आहेत. नव्याने झालेल्या रस्त्यांचे काम उखडल्याचा प्रकार दिसतो. आष्टामोड, मुरूम मोड, अणदूर, जकेकूर-चौरस्ता, मूळज मोड येथील उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे. काही ठिकाणी काम सुरू असले तरी मुदतीत पूर्ण होईल, असे दिसत नाही. बलसुर मोड येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची मागणी पूर्ण झालेली नाही. दोन्ही ठिकाणी उमरग्याचा बाह्यवळण रस्ता सुरू होता, तो धोकादायक बनला.

नव्याने झाडे लावणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने रस्ता दुभाजक व महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. काही भागातील वाळलेली झाडे लावण्यात येणार आहेत. दुभाजकांतील झाडे गवतामुळे झाकली असून गवत काढून झाडांच्या संगोपनासह नव्याने झाडे लावण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लवकरच कामे पूर्ण करण्यात येतील.- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण.

अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एसटीपीएल कंपनीच्या दुर्लक्षामुळे चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले आहे. काम व्यवस्थित व सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण झालेले नसताना टोल वसुली सुरू आहे. वृक्ष लागवडीची कागदोपत्री माहिती अन् प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे.

चौपदरीकरणाचे अर्धवट काम व वृक्ष लागवडीच्या देखाव्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांना दिलीप जोशी यांनी निवेदन दिले होते. परंतु, दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू असतानाही शासन, संबंधित कंपनी आणि प्रशासनाकडून अद्यापही याबाबत दखल घेण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...