आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप:उस्मानाबादेत ११ तास मिरवणुका ; ३९ रथांतून श्रीगणेशाचे थाटात विसर्जन

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या मिरवणुका तब्बल ११ तास म्हणजे मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होत्या. ३९ सजवलेल्या रथातून शहरात श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. समतानगर येथील विसर्जन विहिरी व बार्शी रस्त्यावरील हातलादेवी तलावात विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली होती.गणेशभक्तांनी यंदा दणक्यात गणेशोत्सव साजरा केला. शहरात १०१ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाची स्थापना केली होती. शुक्रवारी विसर्जनाला ३९ मंडळांनी मिरवणूका काढल्या. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान अनेक मंडळांनी मिरवणूका सुरू केल्या. मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत मिरवणूका सुरू होत्या. तब्बल ११ तास गणेशभक्तांनी उत्साही व जल्लोषमय वातावरणात आपल्या आवडत्या बप्पाला निरोप दिला.

हातलादेवी तलाव व समतानगरातील विसर्जन विहिरीत पालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली होती. येथे शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून विसर्जनासाठी मूर्ती येत होत्या. समतानगर येथे पहाटे ३ तर तलावाच्या ठिकाणी पहाटे ४ वाजेपर्यंत मूर्तींचे विसर्जन सुरू होते. येथे पोलिस व आपत्ती व्यवस्थापन समितीची देखरेख होती. कोणतीही अप्रिय घटना घडल्याची पोलिस ठाण्यात नोंद नाही. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. हजाराेंच्या संख्येने गणेशभक्त असताना कोणतेही गालबोट मिरवणूक व उत्सवाला लागले नाही.

पारंपरिक वाद्यांसह डॉल्बी
जवळपास निम्म्यापेक्षा अधिक गणेशमंडळांनी डॉल्बी व त्याच प्रकारचा बँजो लावला होता. यावर युवक व युवतीही थिरकत होत्या. श्री गणेशाच्या आरतीसह गणेश स्तुतीवर आधारित गितांची रेलचेल होती. यासोबत चित्रपटातील गितांवरही भक्त जल्लोषात बेभान होऊन नृत्य करत होते. यासोबतच पारंपारिक ढोल, ढोलकी व सनईचे स्वरही काही गणेश मंडळांच्या रथाजवळ कानी पडत होते. मात्र, याची संख्या नगण्य होती.

लेझीम, ढोल पथकांचे आकर्षक सादरीकरण
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्येक लेझीम व ढोल पथकाने आपले नैपुण्य दाखवले. अस्सल मराठमोळी वेषभूषा परिधान करून युवती, महिलांनी ढोल व लेझीम खेळत मिरवणूक गाजवली. एका लयीत व सुरावर उत्कृष्ट पदलालित्य साधत पथकांनी केलेल्या सादरीकरणावर शहरातील नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव सुरू होता. प्रत्येक ठिकाणी ढोल पथकांचे शानदार स्वागत झाले.

रथांची मनोहारी सजावट
विसर्जन मिरुवणुकीत गणेश मंडळांनी अगदी चढाओढीने आपले रथ सजवले होते. विविध प्रकारची फुले, कागदी व कापडी पताका, ध्वज लावून रथ आकर्षक बनवण्यात आले होते. भगव्या, पिवळ्या रंगांच्या पताका लावण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी तिरंगा ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली होती. तसेच रथावर श्री गणेशासोबतच महापुरूषांची महती सांगणारे गीत लावण्यात आले होते. यामुळे मिरवणुकीला वेगळेच स्फूरण चढले होते.

बातम्या आणखी आहेत...