आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पूर्ण केली असून तब्बल ११५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५२ तलाठी व चार मंडळ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.जिल्ह्यातील विविध महसूल पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या.
त्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महसूल कर्मचारी संघटनेची बैठक घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितेश काळे यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडल्या. यामुळे जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन दहा वर्षाची सेवा गणना करून एकूण ११५ महसूल कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिला आहे.यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांची प्रथम, द्वितीय, तृतिय कालबद्ध पद्धतीने पदोन्नती केली आहे.
यामध्ये ११ महसूल सहाय्यक, १८ अव्वल कारकून,५२ तलाठी, चार मंडळ अधिकारी, दोन वाहन चालक व २८ शिपायांचा समावेश आहे. सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये दहा, वीस, तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंमलात आणली आहे.
त्यानुसार या योजनेखाली पात्र कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत पात्रतेनुसार तीन वेळा या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मागणी केल्यानुसार जिल्हाधिकारी ओम्बासे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी तातडीने ही प्रक्रिया केली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या निर्णयाचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष नितेश काळे यांनी स्वागत केले आहे.
प्रत्यक्ष पदावर पदोन्नती नाही
सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेनुसार प्रत्यक्ष वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जात नाही. तर त्या पदाच्या समतुल्य वेतन मिळते. जागा उपलब्ध झाल्यावर सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्त केले जाते. तेव्हा वेतन वाढत नाही. २२ जणांना सेवेनुसार नायब तहसीलदारांची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.
..तर लाभाची वसूली होणार
कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारली किंवा तो अपात्र ठरवण्यात आला तर त्याला दिलेले लाभ काढून घेण्यात येणार आहेत. त्यांना दिलेले अधिकचे वेतन वसूल करण्याचे अधिकार आस्थापना विभागाला दिले.
निर्णयाचे स्वागत
जिल्हाधिकारी यांनी आम्हा महसूल कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. संवेदनशिलपणे त्यावर तातडीने निर्णय घेऊन आम्हाला पदाेन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. या निर्णयाचे आम्ही सर्वजण स्वागत करत आहोत.-नितेश काळे, जिल्हाध्यक्ष, महसूल संघटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.