आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी ; स्केच तयार करून मुलीने ओळखले आरोपीला

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपी अनोळखी असल्यामुळे मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून स्केच तयार करण्यात आले होते. तपासात पोलिसांनी पूर्ण कसब लावल्याने तसेच सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे नराधम गजाआड गेला. विशेष शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या एका गावात दि. २५ जून २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता एक १३ वर्षीय मुलगी शाळेतून घरी आली. गावाबाहेर ऊसाच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी ती एकटी गेली होती. त्याठिकाणी एक अनोळखी माणूस आला व त्याने तिला उसामध्ये नेत मारहाण केली, तोंड दाबून अत्याचार केला. वाच्यता केल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून तुळजापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी केला. साक्षीदार व मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे स्केच तयार करण्यात आले होते. तसेच तुळजापूर शहरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता साक्षीदारांनी सांगीतलेल्या वर्णनाचे वाहन शहरात फिरल्याचे दिसुन आले. पुढील तपासात पोलिस उपनिरीक्षक डी. डी. बनसोडे यांनी सोलापूर येथून आरोपीचा शोध घेऊन आरोपी व पिकअप वाहन ताब्यात घेतले. आरोपीचे नाव विलास कोंडीबा गलांडे असल्याचे निष्पन्न झाले. अतिरिक्त कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर ओळख परेड घेतली असता पिडीतेने त्याला ओळखले. आरोपीच्या मोबाईल नंबरचे टॉवर लोकेशन घटनेच्या वेळी घटनास्थळावरील असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची सुनावणी विशेष (पोस्को) न्यायाधीश सतिश डी. जगताप यांच्यासमोर करण्यात आली. सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी कामी कोर्ट पैरवी महिला पोलिस नाईक वनिता वाघमारे यांनी सहकार्य केले. साक्षीदारांमध्ये पिडीता, पिडीतेची आज्जी, आरोपीस घटनेपूर्वी व घटनेनंतर घटनास्थळावर पाहणारे साक्षीदार आदींची साक्ष महत्वपूर्ण ठरली. विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी याचा युक्तिवाद ग्राह्य धरून गलांडे याला दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरी व सात हजाराचा दंड केला.

पानटपरी चालक, लाइनमनची साक्षही ठरली महत्त्वाची घटनास्थळच्या बाजूच्या रस्त्यावरील एका पानटपरी चालकाने घटनेच्या वेळी आरोपीला त्याचे वाहन रस्त्यावर लावून पाण्याची बाटली घेऊन उसात गेल्याचे व काही वेळाने तोच धावत पळत येऊन पिकअप वाहन चालु करून तुळजापूर शहराकडे गेल्याचे पाहिले होते. तसेच घटनेच्यावेळी महामार्गावर लाइट खांबावर काम करीत असणाऱ्या दोन लाइनमन यांनी त्याला उसात गेल्याचे व त्या ठिकाणी एका मुलीला उचलल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...