आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वलंत प्रश्न:महावितरणच्या गलथानपणामुळे भूम तालुक्यात 5 वर्षांत 15 शेतकरी मृत; दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही?

भूम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पाच वर्षात १५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, यामध्ये २०२१-२२ मध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही महावितरणच्या एकाही कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. नेहमीच महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

या वेळी महाविरण कार्यालयात ऑपरेटर कोण होते. ऑपरेट होते की दुसरे कोणी त्या ठिकाणी बसवले होते. पाटसांगवी येथे रोहित्र दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक विद्युत पुरवठा कोणी सुरू केला, असे अनेक प्रश्न भेडसावत असल्याने याचा तीव्र संताप नागरिकांतून होत आहे.

तालुक्यात प्रचंड खेदजनक घटना घडूनही याची चौकशी करण्यात आली नाही. मृत उमेश माने यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन संबंधितावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तालुक्यात महाविरणच्या हलगर्जी पणामुळे आशा अनेक घटना घडल्या असून, अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही. यामुळे वारंवार चुकीच्या घटना घडत आहेत. तालुक्यात पाटसांगवी नंतर दुसऱ्याच दिवशी जांब येथे ५ फेब्रुवारी रोजी शेतकरी चंद्रकांत भोरे यांचाही जीव महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच गेला. विशेष म्हणजे पाटसांगवी व जांब येथील घटना लागोपाट घडल्या आहेत. त्याही निव्वळ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे घडल्या आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे तब्बल दोन शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

मात्र, अद्याप महावितरणला जाग आली नसून, कोणत्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. या बाबत अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकारी, कर्मचारी बोलायला तयार नाहीत. या उलट अधिकारी माझ्याकडे काही नाही, मला काही माहिती नाही, ते वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन दिशाभूल करत आहेत. पाटसांगवी येथील घटनेतील संबंधित ऑपरेटर व लाइनमनवर गुन्हा दाखल अपेक्षित होते. परंतु, अद्यापपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नाही. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे यापुढेही आणखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कारवाईची मागणी
पाटसांगवी येथील उमेश माने यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी भूमचे वसीम काजलेकर यांनी केली आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील म्हणाले की, तालुक्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे शेतकरी मृत्युमुखी पडत आहेत. मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...