आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर सुरक्षिततेचा विषय:पंढरपुरात सुरक्षा ठेवण्यासाठी  150  कॅमेऱ्यांची नजर

पंढरपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहर सुरक्षिततेचा विषय आता सुटण्याच्या मार्गावर आहे. शहरातील प्रत्येक दिशेला आणि प्रत्येक चौकात, महत्त्वाच्या ठिकाणी १५० अत्याधुनिक रात्रीच्या अंधारातही काम करणारे सीसीटीव्ही कॅमेरे उभे केले जात आहेत. यासाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्चून पंढरपूर शहर सुरक्षित केले जात आहे.

येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होऊन संपूर्ण शहरातील प्रत्येक क्षण कॅमेराबद्ध होणार आहे. शहर परिसरात असे एकूण १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.पंढरपूर शहरात दररोज सरासरी ४० हजारांवर भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात दिवसभर प्रचंड गर्दी असते. आध्यात्मिक परंपरा असणाऱ्या पंढरीला गुन्हेगारीचीही कलंकित पार्श्वभूमी आहे.

या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, आपत्कालीन व्यवस्थेसाठी सर्व दिशेला सीसीटीव्ही यंत्रणा असावी असा अहवाल शहर पोलिस आणि पंढरपूर नगरपालिकेने तयार केला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस निखिल पिंगळे यांनी तो अहवाल शासनाला सादर केला होता. त्याचा पाठपुरावा नंतरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कारंडे आणि विक्रम कदम यांनी केला आहे. तीन महिन्यांपूर्वी या शहर सुरक्षिततेच्या आराखड्यास मूर्त रूप मिळाले आहे.

परिणामी या घटनेत पोलिस तत्काळ कार्यवाही करू शकतील, वेळेत मदत पोहोचू शकतील. शिवाय आरोपी पकडणे सर्वात सोपे काम होणार आहे. सध्या शहरात हे कॅमेरे बसवण्याचे काम सुरू असून, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष खोलीचे बांधकाम सुरू झाले आहे. लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे उभारणीचेही काम पूर्ण होईल. त्यानंतर ही यंत्रणा कार्यरत होणार आहे संपूर्ण पंढरपूर शहर सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...