आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैयक्तिक व्याज परतावा योजना:मराठा उद्योजकांना 154 कोटींचे कर्ज, परतफेड प्रमाण 99%, 12.64 कोटी व्याज केले परत

उस्मानाबाद / उपेंद्र कटकेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना जिल्ह्यात चांगलीच यशस्वी झाली आहे. जवळपास ९९ टक्के मराठा व खुल्या प्रवर्गातील उद्योजकांनी वेळेत परतफेड केली आहे. यामुळे त्यांना तब्बल १२.६४ कोटी व्याज परतावा मिळाला असून आतापर्यंत २४४१ उद्योजकांना १५४ कोटी ४३ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. परतफेड वेळेवर होत असल्याने व्यवसाय वृद्धीसाठी व नवीन उद्योजकांनाही संधी मिळत आहे.

मराठा समाजातील युवकांना नवीन उद्योग सुरू करता यावेत म्हणून २०१७- २०१८ च्या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे सक्षमीकरण करून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केली होती. अन्य महामंडळांकडून वसुलीच योग्य होत नसल्याने अनेक योजना बंद पडून त्या-त्या समाजातील पुढील पिढीतील युवकांना उद्योजक म्हणून संधी मिळत नाही. याही योजनेबाबत सुरुवातीला असेच कयास बांधण्यात येत होते. मात्र, अनेक मराठा व अन्य काही खुल्या प्रवर्गातील नव उद्योजकांनी परतफेडीचे प्रमाण सातत्याने अधिक ठेवत जिल्ह्यात ही योजना कमालीची यशस्वी केली आहे.

सुरुवातीपासून २४४१ नव उद्योजकांना या योजनेतून तब्बल १५४ कोटी ४३ लाख ७८ हजार ३१४ रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. यापैकी आतापर्यंत २०७० उद्योजकांनी कर्जाची योग्य हप्त्यात परतफेड केल्यामुळे योजना यशस्वीपणे सुरू आहे. अन्य उर्वरित उद्योजकांनीही काही हप्ते भरले असून त्यांचा व्याज परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक व कागदपत्रांच्या अडचणीमुळे याला विलंब झाला. मात्र, आतापर्यंत १२ कोटी ६४ लाख ९४ हजार ३३५ रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे. यामुळे योजना यशस्वी झाली आहे. प्रत्येक हप्त्यानिहाय व्याज माफी: वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून कर्ज घेतल्यानंतर बँका हप्ते पाडून देतात. प्रत्येक हप्ता भरल्यानंतर लगेच व्याज माफी होऊन परतावा देण्यात येतो. मात्र, हप्ता मुदतीच्या बाहेर गेल्यास व्याजमाफी मिळत नाही. पुढील हप्ता वेळेत भरला तर त्याच हप्त्याला व्याज माफी मिळते. यामुळे उद्योजक शक्यतो उद्योग सुरू करूनच हप्त्याची वेळेवर परतफेड करत असल्याने योजना यशस्वी होण्यास मदत झाली आहे.

बँकांकडून अडवणूक नाही महामंडळाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कोणतीही किचकट प्रक्रिया न करता तसेच तारण न घेता प्रस्तावास बँका मान्यता देत आहेत. सद्यस्थितीत कोणत्याही बँकेकडून अडवणूक होत नसल्याचे दिसत आहे. परतफेडीचे प्रमाण चांगले राहिल्यास संबंधित उद्योजकांची पत यापेक्षा बँकेत चांगली राहिल. यामुळे सध्यापेक्षाही अधिक प्रमाणात कर्ज मिळण्यास उद्योजकांना फायदा होईल. यामुळे उद्योजकही याचा फायदा घेत आहेत.

चांगली परतफेड, नवीन प्रस्तावांची भर परतफेडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे नवीन प्रस्ताव घेणेही सुरू आहे. आतापर्यंत ३३८३ अन्य नवीन उद्योजकांनी कर्जासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. त्यांनाही याचा फायदा लवकरच देण्यात येणार आहे. नवीन उद्योजकांना ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. यासोबत फोटोसह सर्व कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थितपणे केल्यानंतर तातडीने प्रस्तावांना मंजुरी देण्यात देऊन कर्जाचे वितरण करण्यात येते.

आता १५ लाखांपर्यंत वाढवली मर्यादा योजनेला चांगला प्रतिसाद व यशस्विता पाहून सध्याच्या एकनाथ शिंदे सरकारने योजनेची आणखी व्याप्ती वाढवली आहे. पूर्वी केवळ १० लाख कर्ज मिळत होते. आता ही मर्यादा १५ लाखांवर नेण्यात आली आहे. तसेच वयोमर्यादा महिलांसाठी ५५ तर पुरूषांसाठी ५० होती. आता सरसकट ६० वयोमर्यादा करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप याचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. नवीन नियमांमुळे मराठा उद्योजकांना चांगला फायदा होईल.

चांगला प्रतिसाद, संपर्क साधून लाभ घ्या जिल्ह्यात वैयक्तिक व्याज परतावा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे व्याज परत करण्याचे प्रमाणही अधिक आहे. नवीन उद्योजकांना कर्ज हवे असल्यास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असलेल्या महामंडळाच्या कार्यालयातून मार्गदर्शन केले जाते. याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा. प्रशांत घुले, व्यवस्थापक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ.

बातम्या आणखी आहेत...