आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांचे लागले लक्ष:166 ग्रामपंचायती; 94 सोसायट्यांविना होणार बाजार समितीच्या निवडणुका

हरेंद्र केंदाळे | उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आठही बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून यासाठी आवश्यक मतदार याद्या ही प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, बाजार समित्यांचे मतदार असलेले १६६ ग्रामपंचायती आणि ९४ सोसायट्यांच्या सदस्यांच्या विनाच मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यावर ३४ जणांचे आक्षेप आले असून त्यानुसार दुरुस्ती सुरु आहे. अंतीम मतदार यादी सात डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या मतदारांना यात सहभागी होता येणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या जिल्हाभर ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला असून सर्वत्र राजकारण तापलेले असताना दुसरीकडे बाजार समित्यांची मतदार याद्या अंतीम करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. अंतीम मतदार यादी आगामी दोन दिवसात प्रसिद्ध होणार आहे. ग्रामपंचायत निकाल २० डिसेंबर रोजी लागणार असला तरी, तत्पूर्वी बाजार समित्यांची मतदार यादी अंतीम होऊन २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. तो पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांचे उमेदवार निवडून येणार असले तरी, त्यांचा समावेश बाजार समितीच्या मतदार यादी मध्ये नसणार आहे.

जिल्ह्यात ४६९ विकास सोसायट्या असून त्यापैकी ९० सोसायट्यांच्या ही निवडणुका होणार आहे. त्यांचीही स्थिती ग्रामपंचायत सारखीच झाली आहे. त्यापैकी ९० सोसायटीच्या निवडणुका सुरु असून त्यांनाही बाजार समितीच्या निवडणुकीत सहभागी होता येणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी वंचित ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या सदस्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे यांच्या समावेशा बाबत अद्याप काहीच सांगता येत नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

चार तालुक्यांतून आले यादीवर ३४ आक्षेप
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आठ पैकी केवळ उमरगा, तुळजापूर, वाशी आणि कळंब या चार बाजार समित्यांच्या मतदार यादीवर आक्षेप आले आहेत. त्यावर प्रशासनाकडून दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले आहेत. दुसरीकडे चार तालुक्यातून एकही आक्षेप आला नाही. त्यात लोहारा, परंडा, उस्मानाबाद आणि भूम बाजार समित्यांचा समावेश आहे.

प्रक्रियेबाबत न्यायालयाच्या आदेशाने चित्र बदलू शकते
आता प्रसिद्ध झालेल्या बाजार समितीच्या मतदार यादीत ९० सोसायटी निवडणुका सुरु असलेल्या ग्रामपंचायतीच्या नावांचा समावेश नाही. मात्र, हे प्रकरण न्यायालयात असून न्यायालयाचे आदेश नामनिर्देशन पत्र प्रक्रिया संपेपर्यंत आल्यास नवीन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार चित्र बदलू शकते. -सुनील शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.

बातम्या आणखी आहेत...