आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र नाराजी:जिल्हा बँकेत हप्ता भरलेले 1780 शेतकरी राहणार खरीप 2020 च्या विम्यापासून वंचित

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून हप्ते भरलेले १७८० शेतकरी खरीप २०२० चा पिकविमा मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. बजाज अलियांझ कंपनीकडून तब्बल अडीच वर्षानंतर त्यांनी भरलेला हप्ता परत मिळणार आहे. यामुळे या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान, अन्य शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याची प्रक्रीया सुरू झाली असून काहींच्या खात्यात जमा झाली आहे. एसबीआय वेगाने प्रक्रिया करत असून अन्य बँकांकडून मंद प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाने त्यांची ८० टक्के प्रक्रिया पूर्ण केली आहे.

खरीप हंगाम २०२० मध्ये खास बाब म्हणून दि.२९ जुलै ते ३१ जुलै २०२० या शेवटच्या तीन दिवसांमध्ये केवळ उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ऑफलाईन पध्दतीने विमा हप्ता स्विकारण्याबाबत सूचना दिलेली होती. यामध्ये जिल्ह्यातील ४८४९ शेतकऱ्यांनी ६९.१७ लाख विमा हप्ता भरून या योजनेत सहभाग नोंदवला होता. जमा झालेला विमा हप्ता १७ ऑगस्ट २०२० ला विमा कंपनीला जिल्हा बँकेने दिली होती. विमा कंपनीने जवळपास ३०६९ शेतकऱ्यांचा ४५.१२ लाख विमा हप्ता पोर्टलवर अपलोड केला. परंतु, १७८० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर दिली नाही. त्यांनी २४.०५ लाख विमा हप्ता भरला आहे. आता सुमारे अडीच वर्षानंतर विमा कंपनी या १७८० शेतकऱ्यांना विमा देता येणार नसल्याचे सांगत आहे. यामुळे या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने सातत्याने पत्रव्यवहार करून या शेतकऱ्यांनाही विम्याचा लाभ देण्याची विनंती केली. मात्र, बजाज अलियांझ कंपनी यासंदर्भात कसलाही प्रतिसाद देण्यास तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीतही कंपनीच्या प्रतिनिधींनी पैसे देण्यास नकार दिला आहे. उलट या शेतकऱ्यांनी भरलेला २४ लाख ५ हजार रुपये हप्त्याची रक्कम परत देणार असल्याचे सांगितले आहे. तब्बल अडिच वर्षांनी कंपनीला उपरती झाली आहे. यामुळे शेतकरी संतप्त आहेत.

कृषी विभागाने ८० टक्के काम
कृषी विभागाने २०२० चा विमा मिळण्यासंदर्भात ८० टक्के प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता बँकांची जबाबदारी वाढली आहे. त्यानुसार काही बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरीत करण्यास प्रारंभ केला आहे. काही गावातील शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, रक्कम वितरणात अद्याप वेग नाही. परंतु, गुरूवारी यामध्ये वेग येण्याची शक्यता आहे.

...तर हप्ता झाला असता हडप
सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विमा मिळवण्यासाठी न्यायालयिन व रस्त्यावरची लढाई लढली आहे. तसेच “दिव्य मराठी”ने हा विषय लावून धरला होता. प्रशासनाने सकारात्मक पाऊले उचलली. यामुळे विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रियाच झाली नसती तर कदाचित विमा कंपनीने या शेतकऱ्यांची २४ लाख ५ हजार रुपयांची रक्कम हडप केली असली.

बातम्या आणखी आहेत...