आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीच्या राेगाचे सावट:रस्त्यालगत 2 किमी घाणीचे साम्राज्य ; राष्ट्रीय महामार्गाला गटारीचे स्वरूप

उमरगा / अंबादास जाधव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे विविध साथीच्या राेगाचे सावट असताना शहरात राष्ट्रीय महामार्गालगत मुख्य गटार नसल्याने राष्ट्रीय महामार्गाला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील अंतर्गत भागात गटारी तुंबल्याने खुल्या भूखंडात दुर्गंधीयुक्त पाणी साचत असून साचलेले हे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गांच्या लगतच दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहत आहे. डेंग्यू, चिकणगुणिया सदृश्य आणि साथ आजाराची भीती निर्माण झाली आहे. अगोदरच कोरोनाच्या विषाणू संसर्गाने हैराण असलेल्या नागरिकांना मागील काही दिवसा पासून वातावरणात थंड गारवा, ढगाळ व दमट हवामान निर्माण झाल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ संकल्पना कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष विशाल माने म्हणाले की, शहरात राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत भागात अनेक समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अंतर्गत भागातील गटारी तुंबल्या असून अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना संसर्गापासून दूर असताना राष्ट्रीय महामार्ग व शहरातील अंर्तगत भागातील स्वच्छतेची ओरड सुरू आहे. अनेक भागात गटार नसल्याने पाणी रस्त्यावर येत असून महामार्गावर थांबत आहे. याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

मूलभूत सुविधा नाहीत महामार्गालगत अन अंतर्गत भागात रस्ते आणि गटारी नसल्यामुळे वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणचे खुल्या भुखंडाच्या चहूबाजूंनी काटेरी कुंपण व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी घाण पाण्याचे डबके तयार होवून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.सर्वत्र पसरलेल्या घाणीने रात्रीच्या दरम्यान महिला, मुले व नागरिकांना बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. पालिकेच्या अनेक भागात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधा पोहचल्या नाहीत. दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून पालिकेने वेळीच लक्ष घालून सुविधा उपलब्ध कराव्यात. पावसाळयात हा त्रास आधिकच गंभीर आहे. अनिल केशवशेट्टी, नागरिक.