आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आधार प्रमाणीकरणाअभावी 2 हजार 285 शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रोत्साहनपर योजनेपासून वंचित

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर केली असून २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार २८५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही. यामुळे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या डोक्यावर नेहमीच कर्जाचा बोजा असतो. यामुळे कर्जमाफी केली असून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २९ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर झाली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेंतर्गत १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ४० हजार ४८३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द केल्या. त्यापैकी २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३८ हजार १९८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी ३४ हजार ४७१ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर १०१ कोटी ६० लाख रुपये जमा करण्यात आले. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने सुरू आहे.

योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यातील २ हजार २८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करतेवेळी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कमीटीकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यांनी जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क करून तक्रारीचे निराकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच प्रोत्साहनपर लाभ मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना माहिती नसल्याने अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे लाभ मिळण्यास अडचण येत आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तसेच ऑनलाईन तक्रारीचे निराकरण करून योजनेचा लाभ घ्यावा.-डॉ. ओंबासे, जिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...