आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील सात महिन्यापासून कळंब-येडशी या राज्य मार्गाच्या २२ किलोमीटरच्या प्रलंबित कामावर स्थगिती असल्यामुळे हे काम प्रलंबित आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांनी याकडे लक्ष देऊन स्थगिती उठवावी, अशी मागणी जोर धरत आहे. कळंब शहरातून जिल्ह्याला जाणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे कळंब- मोहा- येडशी- धाराशिव हा असून याची लांबी ४६ किलोमीटर आहे. कळंब मोहा-येडशी हा रस्ता कळंब तालुका मुख्यालय ते धाराशिव जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर तांदुळवाडी, शेळका धानोरा, मोहा, हाळदगांव, सातेफळ, शेलगाव व इतर गावे जोडली जातात. तसेच या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्यामुळे अधिक प्रमाणातच ऊस वाहतूक होत आहे. सध्या रस्ता नादुरुस्त असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षांपासून कळंब मोहा-येडशी या ३ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार आहे, असे सांगण्यात येत होते.
कोरोना काळात तीन ते चार कामे मंजूर झाली आहेत. परंतु, २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर देण्यात आलेल्या स्थगितीमध्ये अडकल्यामुळे ही मंजूर कामे सुद्धा प्रत्यक्षात येऊ शकली नाहीत. कळंब मोहा-येडशी कामही यापैकीच आहे. स्थगिती तत्काळ उठवून या रस्त्याची मंजूर असलेली सर्व कामे सुरू करावीत, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून जोर धरू लागली आहे.
खड्ड्यांमुळे प्रवास खडतर
कळंब -येडशी राज्य मार्गाच्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अवघड झाले आहे. येथून नियमित प्रवास करणाऱ्यांची वाहने खिळखिळी झाली आहेत. तसेच लहान-मोठे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच काहीजण दुचाकीवरून जातात. त्यावेळी दुचाकी घसरून अनेकवेळा अपघात होतात. यामुळे तातडीने रस्ता दुरूस्त करण्याची गरज आहे.
क्राँक्रिटीकरण अपूर्ण
कळंब, मोहा, येडशी रस्ता हा राज्यमार्ग क्र. २४१ आहे. याची एकूण लांबी ३० किलोमीटर ५०० मीटर इतकी आहे. जून २०१९ च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण ५ किलोमीटर ७०० मीटर लांबीचे डांबरी व ३५५ मीटर लांबीमध्ये काँक्रीट रस्ता करणे मंजूर आहे. सद्यःस्थितीत डांबरीकरणाचे व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झालेे आहे. यामुळे येथून वाहन चालवणे अशक्य होत आहे.
२२ किलोमीटरच्या कामालाही मंजूरी
मार्च २०२२ चा अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ मध्ये अंतर्गत उर्वरित २२ किलोमीटरमधील रस्ते डांबरीकरण व काँक्रीट रस्त्याला प्रशासकीय मंजूर देण्यात आली आहे. परंतु, या कामासही स्थगिती देण्यात आलेली आहे. याची स्थगिती तत्काळ उठवण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.