आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हेचा निष्कर्ष:24 % उस्मानाबादकरांकडे बोअरचे पाणी, मात्र 5 % कुटुंबीयांनीच केले जलपुनर्भरण; विद्यापीठ उपकेंद्रातील जल व भूमी व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केले सर्वेक्षण

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी संकट टाळण्यासाठी छतावरील पाण्याचे पूनर्भरण हा प्रभावी उपाय आहे. मात्र, याबद्दल उस्मानाबादकरांमध्ये जागृतीचा अभाव आहे. उस्मानाबादेत २४ टक्के कुटुंबीय बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून आहेत.मात्र, ५० टक्के कुटुंबीय पूनर्भरणाबद्दल अनभिज्ञ आहेत. केवळ ५ टक्के कुटुंबीयांनी पाण्याचे पूनर्भरण केले असून, त्यांना अवर्षणस्थितीत फायदाही झाला. उर्वरित १९ टक्के कुटंुबांनी पूनर्भरण केलेले नाही. विशेष म्हणजे पूनर्भरण करण्याची इच्छा असलेल्या ५० टक्के कुटंुबियांना याबद्दलचे मार्गदर्शनच मिळत नाही, असा त्यांनी दावा केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील जल व भूमी व्यवस्थापन शास्त्र विभागाने शहरात केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

उस्मानाबाद आणि पाण्याचा दुष्काळ, हे समीकरण ठरलेले आहे. शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली असली तरी २० टक्के कुटुंबीय नळ योजनेसोबतच बोअरवेलच्या पाण्यावर निर्भर आहेत. २४ कुटुंबीयांकडे केवळ बोअरवेल आहेत.५६ टक्के कुटुंबीय केवळ नळ योजनेवर अवलंबून आहेत. अलीकडच्या ३ वर्षात पर्जन्यमान वाढल्याने पाणीटंचाईची परिस्थिती काहीशी बदलली असली तरी बदलत्या ऋतुचक्रानुसार अवर्षणाचा फेरा येऊ शकतो.त्यामुळे बोअरवेलचे पूनर्भरण हा प्रभावी मार्ग आहे. जेणेकरून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास बोअरवेलचे स्त्रोत कायम सुरू राहू शकतात. मात्र, उस्मानाबादकरांमध्ये पूनर्भरणाबद्दल मार्गदर्शनाचा अभाव आहे.

बोअरवेलवर अवलंबून असलेल्या केवळ ५ टक्के कुटुंबीयांनीच पूनर्भरण केले असून, १९ टक्के कुटुंबियांच्या छतावरील पावसाचे पाणी वाहून जाते. बोअरवेल असलेल्या ५० टक्के कुटुंबियांना पूनर्भरणाबद्दल माहितीच नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.उर्वरित ५० टक्क्यांमध्ये पूनर्भरणाची इच्छा असलेल्या ७४.४ टक्के कुटुंबीयांनी याबद्दल मार्गदर्शनच मिळत नसल्याची सबब सांगितली आहे. बोअरवेलचे पूनर्भरण केलेल्या ५ टक्के कुटुंबीयांनी मात्र पाण्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. काही कुटुंबीयांनी तर बंद पडलेले बोअरवेल पूनर्भरणामुळे सुरू झाल्याचे नमूद केले. काही कुटुंबांना मात्र पूनर्भरणाचा खर्च अनाठायी वाटतो.दरम्यान,जल व भूमी व्यवस्थापन शास्त्र विभागाचे विद्यार्थी अर्जून बारंगुळे, सय्यद साजिद, मोहम्मद हंजला लुंजे, नाजिया काझी यांनी शहरात चार भाग तयार करून ३ महिने सर्वेक्षण केले. त्यांना विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

प्रतिव्यक्ती ८६ लिटर वापर
जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र विभागाने शहरातील ५०० कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यामधील ५६ टक्के कुटुंब दैनंदिन पाण्याची गरज भागविण्यासाठी नगर परिषदेच्या नळ योजनेवर अवलंबून आहेत. नळ व बोअरवेल, असे दोन्ही असणाऱ्या कुटुंबामध्ये सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन प्रतिव्यक्ती ८६ लिटर पाण्याचा वापर करतात. केवळ बोअरवेल असणाऱ्या कुटुंबामध्ये हे प्रमाण ८१.२५ लिटर प्रतिव्यक्ती तर केवळ नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबामध्ये ७९ लिटर प्रतिव्यक्ती पाणी वापराचे प्रमाण आहे.

३० टक्के कुटुंबाकडे भूमिगत हौद
शहरातील ५२ टक्के कुटुंब पाणी साठविण्यासाठी छतावरील टाकी वापरतात. त्यांची प्रतिकुटुंब पाण्याची साठवण क्षमता १६८९.४६ लिटर आहे. ३०.५ टक्के कुटुंब भूमिगत हौद वापरतात व त्यांची पाणीसाठवण क्षमता २९०५.६९ लिटर आहे. छतावरील टाकी व भूमिगत पाण्याचा हौदाचा वापर करणारी एकूण ३४ टक्के कुटुंब आहेत.

विद्यार्थी व मी मोफत तांत्रिक मार्गदर्शन करणार
विद्यार्थ्यांमार्फत तसेच मी स्वत: बोअरवेलचे पुनर्भरणाबाबत मोफत तांत्रिक मार्गदर्शनाचा निर्णय घेतला.नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा.पुनर्भरणाने भूजल पातळी वाढून टंचाई दूर करता येते.
-डॉ. नितीन पाटील, विभागप्रमुख, जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र.

पुनर्भरणाने बोअरचे पाणी आटले नाही
माझ्याकडे २१० फूट बोअरवेल आहे. २००६ मध्येच छतावरील पाण्याचे पुनर्भरण करत ते पाणी बोअरमध्ये सोडले. त्यामुळे दुष्काळ पडला तरी पाणी आटले नाही.
प्रशांत महाजन, नागरिक, राजीव गांधी नगर, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...