आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात एकीकडे वृक्षलागवडीची चळवळ रुजत असताना दुसरीकडे संगोपन केलेली झाडे जाळण्याची विकृत मानसिकता समोर येत आहे. आजवर लागवड केलेली सुमारे २५ झाडे कचऱ्यासोबत पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार घडला असून, याबद्दल वृक्षप्रेमी संजय निंबाळकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
निंबाळकर यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात प्रमुख रस्त्यालगत निंब वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. ते दरवर्षी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी उस्मानाबाद उपकेंद्रात आमूलाग्र बदल घडवला आहे.
त्यांच्या कल्पनेतून या परिसरात देखील वनराई बहरली आहे. उस्मानाबादेत आनंद नगर, समता कॉलनी, येडशी रोड, सिंचन विभाग परिसर, बायपास रोड भागात लावलेल्या झाडांमुळे दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. मात्र अशा परिस्थितीत काही नागरिक झाडांच्या संगोपनासाठी पुढे येण्याऐवजी झाडांवरच घाव घालत आहेत, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. कचरा पेटवून देऊन झाडांना आग लावण्याचा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी घडला असून, त्यामुळे वाढलेली झाडे जागीच करपत आहेत. काही ठिकाणी साफसफाई करून गोळा केलेला कचरा झाडाजवळ आणून जाळला जातो, त्यामुळे आतापर्यंत किमान २५ झाडे जळाली आहेत, असे संजय निंबाळकर यांनी सांगितले.
पालिकेने कारवाई करावी
शासनाने वृक्षलागवड मोहिमेचे उद्दिष्ट सर्व सरकारी विभागांना दिले. मात्र उस्मानाबाद नगरपरिषदेच्या माध्यमातून घनवनच्या पलीकडे वृक्ष लागवडीसाठी योगदान दिसत नाही. मात्र, कचरा गोळा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून इतर लोकांनी लावलेल्या झाडांचे नुकसान करण्याचा प्रकार सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी संजय निंबाळकर म्हणाले, आम्ही पर्यावरणासाठी झाडे लावतो, मात्र त्याचे नुकसान करण्याचे काम पालिकेची काही यंत्रणा करत आहे, हे दुर्दैवी आहे. मुळात कचरा पेटवून देणे बेकायदेशीर आहे. याविरुद्ध पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.