आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूडबुद्धीचा आरोप:25.62 कोटींच्या कामांना स्थगिती; तक्रारी आलेल्या कामांनाच स्थगिती असल्याचे पालकमंत्र्यांचे म्हणणे

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध योजनांमधील २५ कोटी ६२ लाख ९१ हजार रुपयांच्या कामांना स्थगिती दिल्यामुळे आता शिवसेनेच्या दोन गटात संघर्ष पेटला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाचे असलेले पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी हा राजकीय सुडबुद्धीने निर्णय घेतला असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, केवळ त्रुटी, तक्रार असलेल्या कामांनाच स्थगिती असल्याचे पालकमंत्री प्रा. डॉ सावंत यांनी सांगितले.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना या विकासकामांना ३० मार्चला प्रशासकीय मान्यता मिळालेली असताना प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी निविदा उघडल्या नाहीत. विकासकामांच्या निविदा उघडून विकासकामांचा कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देणे आवश्यक आहे. या प्रकरणी पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता केव्हाही लागू शकते. कामे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील असल्यामुळे कामे पूर्ण होऊन ३१ मार्च २०२३ पर्यंत निधी खर्च होणे अपेक्षित आहे.

यासाठी केवळ ३ महिन्याचा कालावधी आहे. असे असताना विकासकामाचे श्रेय मिळू नये याकरिता शिंदे-फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक कामांना स्थगिती देऊन शहराच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला, असे आंदोलक म्हणतात.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, पंकज पाटील, अजय नाईकवाडी यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी शहरप्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, भीमा जाधव, बंडू आदरकर, प्रशांत साळुंके, बाळासाहेब काकडे, विनोद केजकर, राम साळुंके, संभाजी दळवी, प्रशांत जगताप, वैभव वीर, पांडुरंग माने, सत्यजित पडवळ आदी उपस्थित होते.

सोमनाथ रेड्डींचेही पत्र
शहरातील विविध विकास कामांना स्थगिती देण्यासाठी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना २८ नोव्हेंबरला पत्र दिले आहे. (जा. क्र. ६५४) तसेच विशेष कार्य अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनीही पत्र दिले आहे. त्यावर मुख्याधिकारी यांनी कार्यवाही केली. याचाही खुलासा मागवण्याची मागणी केली आहे.

त्रुटी, तक्रार असलेल्या कामांना स्थगिती
विविध कामांमध्ये तक्रारी आल्या होत्या. अशा कामांचा अपहार होऊ नये म्हणून स्थगिती दिली आहे. तसेच अनेक कामांमध्ये व निविदा प्रक्रियांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. अशा कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. अहवाल मागवून सध्या स्थगिती असलेल्या कामांची परिस्थिती पाहून स्थगिती उठवली जाईल.-प्रा. डॉ. तानाजी सावंत, पालकमंत्री.

बातम्या आणखी आहेत...