आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतवर्षी विमा भरूनही तालुक्यातील २६ हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांचा रोष वाढल्यानंतर तक्रारी दाखल करून घेतल्या. मात्र, त्या शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळाला नाही. यंदाही तसाच प्रकार होत असून विम्यापासून वंचित शेतकऱ्यांकडून तक्रारी अर्ज घेऊन समज काढली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
यावर्षी खरिपात जवळपास ६५ हजार शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी विमा हप्ता भरला आहे. गतवर्षीही सर्व शेतकऱ्यांनी विमा भरला होता. मात्र, परतीचा पाऊस व सुरुवातील पावसाने दिलेल्या खंडामुळे खरिपाचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, ऑनलाइन तक्रारी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. या संतापाचा उद्रेक होऊ नये, म्हणून वाशी तालुका कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांकडून नुकसानीबाबत तक्रारी अर्ज व विमा पावतीच्या छायांकित प्रतिमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यावेळी २६ हजार तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते.
कृषी विभागाकडून सदरील अर्ज बजाज आलियांझ या पीकविमा कंपनीला मेल व संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींकडे देण्यात आले होते. मात्र, २६ हजार तक्रारी अर्जांना विमा कंपनीकडून अद्याप एक रुपयाचाही विमा देण्यात आला नाही. यावर्षीही गतवर्षीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही.
यंदा विमा भरलेल्या ६५ हजार शेतकऱ्यांपैकी ६० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. यंदा जिल्ह्यात शासकीय विमा कंपनी असूनही भरपाई मिळत नाही. मोजक्याच शेतकऱ्यांना विमा देण्यात आला. त्यातही प्रचंड तफावत आहे. एक हेक्टरसाठी एका शेतकऱ्याला २ हजार तर दुसऱ्या शेतकऱ्याला ८ हजार अशी रक्कम खात्यावर जमा झाली आहे.
जमा झालेली ८ हजाराची रक्कम देखील कृषी विभाग व विमा प्रतिनिधींनी स्थळपाहणी पंचनाम्यात दिलेल्या नुकसान टक्केवारीच्या तुलनेत नगण्य आहे. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या सांगण्यावरून शहरात विमा कंपनीकडून विमा कार्यालय उघडण्यात आले, येथे तक्रारी अर्ज घेण्यात येत आहेत. शुक्रवारपर्यंत २ हजार ७३४ अर्ज आले आहेत.
मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही घेतलेल्या अर्जांना केराची टोपली दाखवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत संबंधित कार्यालयातील तालुका प्रतिनिधींना विमा कंपनीकडून तक्रार अर्ज घेण्याबाबत आदेश आहेत का? अशी विचारणा केली असता कंपनीचे आदेश नाहीत, कृषी विभागाच्या सांगण्यावरून अर्ज घेत आहोत, असे सांगण्यात आले. यामुळे यंदाही गतवर्षीप्रमाणे तक्रारी अर्ज घेऊन शेतकऱ्यांची समज काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
पंचनामा झाला, अद्याप विमा रक्कम नाही
मला पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने एक हात एक पाय कायम निकामी झाला.कुटुंबाचे प्रमुख उत्पन्न शेती असल्याने लहान मुले व पत्नी शेती व मजुरी करतात. भरपाई मिळावी म्हणून ऑनलाइन तक्रार नोंदवली. त्यानंतर वीमा कंपनीचा प्रतिनिधी व कृषी विभागाच्या प्रतिनिधीने संयुक्त पाहणी करून पंचनामा केला. परंतु, अद्याप विमा जमा झाला नाही. सतत कार्यालयात हेलपाटे मारण्यासाठी पैसाही नाही. कार्यालयात कोणीच दखल घेत नाहीत.-विश्वनाथ येडे, अपंग शेतकरी, महालदारपुरी.
तक्रार केली, २ हजार मिळाले
मागील वर्षी विमा भरून ऑनलाइन तक्रार केली, तसेच कृषी कार्यालयात रितसर नुकसानीचा अर्ज दिला हाेता. परंतु, अद्याप पीकविमा मिळाला नाही. यंदाही तक्रार केली आहे. परंतु, दोन हजार रुपये विमा मिळाला आहे. यावर्षी सरकारी विमा कंपनी असल्याने चांगला विमा मिळण्याची अपेक्षा हाेती. परंतु, यंदाही विम्यापासून वंचित आहाेत.-किसन टकले, शेतकरी, वाशी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.