आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेतून शेतकरी, वैयक्तक कंपनी किंवा उद्योग उभारणीचे ३२ प्रकल्प होते. दोनच वर्षात ‘आत्मा’च्या माध्यमातून उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. त्यानुसार ११ कंपन्यांना मान्यता मिळाली. यातून २७५० शेतकरी उद्योजक तयार झाले. प्रकल्पाच्या प्रकारानुसार शासनाकडून दोन ते तीन कोटी रुपयांचे अनुदान या प्रकल्पास दिले जाते. आगामी काही महिन्यात या प्रकल्पातून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांची उन्नती होण्यासाठी शासनाकडून या योजनेला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उद्योगशील बनवण्यासाठी शासनाकडून ‘आत्मा’च्या माध्यमातून पोखरा, स्मार्ट अशा दोन योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात स्मार्टच्या माध्यमातून पाच वर्षात ३२ कंपन्या तयार करण्यात येणार आहेत. मात्र, या योजनेतून अवघ्या दोनच वर्षात योजनेतील ३२ प्रकल्प अंतीम करण्यात आले आहेत. त्यापैकी ११ प्रकल्प मंजूर असून त्यांना शासनाकडून टप्प्याटप्याने निधी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर उर्वरित प्रकल्प प्रक्रिया सुरू असून आगामी काळात त्यांनाही मंजुरी मिळून ते प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे समोर आले.
त्याची प्रक्रिया विविध प्रकारच्या सात विभागातून ११ कार्यालयातून होत असल्याने त्यास काही प्रमाणात विलंब हाेत असला तरी, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना प्राथमिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यानंतर राज्यस्तरावर अंतिम मंजुरी मिळून प्रकल्प सुरू करण्यात येतो. त्यासाठी स्थानिक पातळीवर ‘आत्मा’ कार्यालयातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत परिपूर्ण असे प्रस्ताव तयार करुन घेत त्याची पडताळणीही करण्यात येते. त्यानंतरच राज्यस्तरावर मंजुरीसाठी प्रस्ताव जातात. त्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व प्रकल्पांची पडताळणी करण्यात येत असून त्यापैकी अकरा प्रकल्प राज्य स्तरावर गेले असून त्यास शासनाकडून मंजुरीही देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या आणि छाननीच्या प्रक्रियेत असून तेही लवकरच मंजूर होणार असल्याचे संकेत आत्मा विभागाकडून मिळाले आहेत.
जागतिक बँकेसह राज्य शासनाच्या अर्थसहाय्यातून प्रकल्पाला सुरुवात जागितक बँक आणि राज्य शासनाच्या अर्थ सहकार्यातून हा प्रकल्प सुरु करण्यात आला. ७० % जागतिक बँक, २७ % राज्य शासन आणि तीन टक्के सीएसआर असा फंड पूर्ण योजनेसाठी देण्यात आला आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. यातून प्रकल्पही लवकरच कार्यान्वित होणार आहे. महादेव असलकर, मूल्य साखळी विकास तज्ञ, स्मार्ट योजना.
या कंपन्यांना मिळाली अंतिम मंजुरी {अनंतछाया अॅग्रो प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनी लि. उस्मानाबाद. {अभिनव विकसीत शेतकरी उत्पादक कंपनी लि. बेंबळी. {भाटशिरपुरा ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. {गुंजोटी फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. गुंजोटी {वाल्मिकेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. वालदंड, ता. भूम. {एन.एन.जी प्रोड्युसर कंपनी लि. कानेगाव, ता. लोहारा. {नैतिक प्रोड्युसर कंपनी लि. वाशी, ता. वाशी. {यशस्विनी कृषी मित्र प्रोड्युसर कंपनी लि. कोंड. ता. उस्मानाबाद. {सयाजी प्रोड्युसर कंपनी लि. शेळका धानोरा ता. कळंब. {कृषी जगत फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. मंगरुळ, ता. तुळजापूर. {सुभेकर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. सुंभा, ता. उस्मानाबाद.
शेतकरी उद्योजक कंपनीसाठी निकष, पात्रता शेतकरी उद्योजक कंपनी सुरू करण्यापूर्वी अथवा शासनाचे अनुदान मिळण्यापूर्वी त्यांनी काही अटी दिलेल्या आहेत. त्यानुसार शेतकरी कंपनी अडचणीत न येता, त्यांना अधिक फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणीकृत संस्था हवी, अथवा वैयक्तिक संस्था हवी. एका संस्थेत २५० किंवा त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा समावेश हवा. संस्थेचे ऑडिट रिपोर्ट आणि बॅलन्सशीट अपडेट असणे आवश्यक आहे. शेतकरी कंपनीकडून जे उत्पादन करण्यात येईल, त्याचा खरेदीदारासोबत करार करणे अत्यावश्यक आहे.
२०१९ पासून २०२२ मध्ये गती हा प्रकल्प शासनाकडून २०१९ मध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार कामही सुरु होते. मात्र, दोन वर्षे आलेल्या कोरोना महामारीमुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला होता. मात्र, २०२२ मध्ये या प्रकल्पास कर्मचारी आणि मनुष्यबळ मिळाले आहे. तसेच कोरोनाचे सावटही संपल्याने या वर्षात या प्रकल्पास गती आली आहे. त्यामुळे कोरोना संकट संपल्यापासून अवघ्या काही महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.