आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात नवीन इंग्रजी शाळा सुरू करण्याचे 28 तर मराठी शाळांचे 14 प्रस्ताव दाखल

उस्मानाबाद / उपेंद्र कटके4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात नवीन इंग्रजी शाळा सुरू करण्याचे २८ तर मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे १४ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. यातील काही शाळांच्या प्रस्तांवाना इरादापत्रही मिळाले असून काहींच्या त्रुटी राहिल्या आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाची चलती असल्यामुळे अनेक संस्था इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांपैकी १३ इंग्रजी शाळांनी दर्जावाढ मागितली आहे.

उच्च शिक्षणाचे इंग्रजी माध्यम असल्यामुळे तसेच देशात सुरू असलेल्या जवळपास ७० टक्के प्रमाणपत्र, पदविका व पदवीस्तरीय व्यवसायिक अभ्यासक्रमांचीही भाषा इंग्रजी असल्यामुळे अलीकडे इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी पालकांचा कल वाढलेला आहे. यामुळे इंग्रजी शाळा खचाखच भरलेल्या असतात. काही शाळांमध्ये जागा नसतानाही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या रांगा संपत नाहीत. यामुळे अनेक खासगी शैक्षणिक संस्था आता इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल करत आहेत. यावर्षीही अनेक संस्थांनी प्रस्ताव दाखल केला आहे.

जिल्ह्यात या वर्षीच तब्बल २८ इंग्रजी शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. सर्व प्रस्ताव क्षेत्रस्तरीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये प्रस्तावांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १८ शाळांना इरादापत्रही देण्यात आले आहे. त्यांनी प्रस्तावात केलेल्या दाव्याप्रमाणे शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याचे पाहणीत दिसून आल्यानंतर इरादापत्र मंजूर करून शाळांना वर्ग भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ज्या १० शाळांनी त्रुटींची पुर्तता केलेली नाही. त्यांना पुन्हा पुर्तता करून प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे. दरम्यान, १४ मराठी माध्यमांच्या शाळांसाठीही प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यापैकी तीन प्रस्ताव अपात्र ठरले असून उर्वरित शाळांना इरादापत्र देण्यात आले आहे. एकूणच मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळा सुरू करण्याकडे कल आहे.

अनुदान नसतानाही इंग्रजी शाळेची मागणी होतेय सध्या पालकांचा इंग्रजी शाळांकडे ओढा अधिक आहे. अशात जिल्हा परिषद शाळांमधील सेमी इंग्रजी माध्यम बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेक पालक सध्या चांगली इंग्रजी शाळा शोधत आहेत. यासाठी ते मागेल तितके शुल्क देण्यास तयार आहेत. यामुळे संस्था इंग्रजी शाळा सुरू करण्याचा विचार करत आहेत. मराठीसाठी अनुदान मिळू शकते. तरीही इंग्रजी हवे आहे.

जिल्ह्यामधील १३ इंग्रजी शाळांनी मागितली दर्जावाढ अनेक इंग्रजी शाळांना प्राथमिक व माध्यमिक स्तरापर्यंत वर्ग सुरू करण्याची परवानगी आहे. काही शाळांना तर प्राथमिक वर्गापर्यंतच वर्ग सुरू करता येऊ शकतात. आता अशा शाळांनी पुढील वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी दर्जावाढीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या जिल्ह्यातील १३ इंग्रजी शाळा आहेत. एका उर्दू तर १४ मराठी शाळांनीही दर्जावाढ मागितली आहे.

एकाच मान्यतेवर अनेक ठिकाणी शाळा,संस्थाचालकांचे उखळ पांढरे सध्या जिल्हा परिषदेच्या रेकाॅर्डला सुमारे १३० इंग्रजी शाळा आहेत. परंतु, एकाच शाळेच्या मान्यतेवर अनेक ठिकाणी शाळा चालवण्याचे प्रकार काही ठिकाणी सुरू आहेत. म्हणजे एका गावात शाळेला मान्यता असेल तर दुसऱ्या दुरच्या किंवा जवळच्या गावात त्याच नावाने शाळां चालवण्याचा प्रकारही घडत आहेत. यामुळे संस्थालचाकांचीही चांगली कमाई शुल्काच्या माध्यमातून होत असते. शिक्षण विभागाला आपल्याच शाळांमध्ये काय गोंधळ सुरू आहे, हे पाहण्यासाठी मनुष्यबळ नाही.

बातम्या आणखी आहेत...