आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांची फसवणूक:तुळजापूर मंदिर परिसरात 3 बनावट पुजारी ताब्यात

तुळजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूरमध्ये भक्तांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार त्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या. त्याच अनुषंगाने रविवारी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना सोबत घेत मंदिर संस्थानने बजरंग उत्तम शेळके (रा. अंबुलगा, ता. निलंगा), प्रेमनाथ प्रकाशनाथ पुजारी, गणेश कुंडलिक साळुंखे (दोघे रा. तुळजापूर) या तीन बनावट पुजाऱ्यांना ताब्यात घेतले.

गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत पुजाऱ्यांकडून तुळजापुरात भक्तांना फसविण्याचे तसेच मंदिर दर्शनाचे नियम तोडून दर्शन घडवण्याचे काम करण्यात येत आहेत. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार संस्थानने पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन भाविकांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत-बनावट पुजाऱ्यांना निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी तिघांना मंदिर संस्थानच्या हवाली केले. संस्थानने तिघांना थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे बनावट पुजाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

भाविकांना थेट दर्शनाचे आमिष दाखवून पैसे घेऊन मुख दर्शन रांगेत सोडून गायब होणे, दर्शन रांगेत घुसवणे, सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालणे, त्यांना शिवीगाळ करणे, दर्शन पास शिवाय सोबतच्या भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने ४ फेब्रुवारीला तिन्ही पुजारी मंडळांना पत्र लिहून अनधिकृत व बनावट पुजाऱ्यांची ओळख पटवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिंदे यांनी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना सोबत घेऊन ०३ अनधिकृत व बनावट पुजारी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...