आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:तुळजापुरात न्यायालयासाठी 31 कोटींच्या प्रशासकीय कामास मान्यता

तुळजापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर येथील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी ३१ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नळदुर्ग रोडवर हंगरगा (तुळ) शिवारात तब्बल ५ एकर जागेत कोर्ट ईमारत, न्यायाधिश निवासस्थाने, बगीचा, पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून भविष्यात वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुळजापूर येथील दिवाणी न्यायालयाची इमारत खुप जुनी असून कामकाजासाठी अपुरी पडत आहे. परिणामी नवीन इमारतीची मागणी २०१८ मध्ये जोर धरू लागली होती. सुरुवातीला पालिकेची उस्मानाबाद रोड पार्किंग, लातूर रोडवरील भात संशोधन केंद्र आदी जागांची चाचपणी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी शहराबाहेर नळदुर्ग रोडवरील हंगरगा ग्रामपंचायतीची ५ एकर गायरान जमीन निश्चित केली. दरम्यान तुळजापूर येथे न्यायालयाची नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी ३१ कोटी रुपयांच्या कामास ७ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामासाठी चालू अर्थसंकल्पात निधीची तरतूद होऊन काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात वर्षातील बहुतेक दिवस भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवात ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, न्यायालयासाठी नव्याने शोधलेली जागा शहरापासून दोन किलो मिटर दूर तसेच दोन्ही बाह्य वळण रस्त्याने जाणे सोयीचे असल्याने नागरिकांची गर्दीपासून सुटका होणार आहे.

भविष्यात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
नवीन इमारतीच्या पूर्णत्वानंतर तुळजापूर येथे वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. यामुळे खटल्यांना गती येऊन पक्षकारांना उस्मानाबादला जाण्याची गरज भासणार नाही.' अॅड. दादासाहेब सोंजी, ज्येष्ठ विधिज्ञ.

नळदुर्ग रोडवरील जमिनीचे भाव गगणाला
नळदुर्ग रोडवर न्यायालय होणार असल्याचे जाहीर होताच या भागातील जमिनीचे दर दुपटीने वाढले आहे. मुळातच भौगोलिक परिस्थितीमुळे तुळजापूर शहरात केवळ उस्मानाबाद रोड व नळदुर्ग रोडवर सुधारणा होत असून न्यायालयाच्या घोषणेनंतर नळदुर्ग रोडवरील जमिनीचे दर गगणाला भिडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...