आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना आशा:ऑगस्टमध्ये 32% तुटीचा पाऊस, सप्टेंबरमध्ये अनुकूल वातावरण ; कळंबला पावसाची गरज

उस्मानाबाद / बाळासाहेब मानेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १ ते ३० ऑगस्टपर्यंत १३९.५ मिमी पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत फक्त १०५.१ मिमी म्हणजे ६८.७ टक्केच पाऊस पडल्याने ३१.३ टक्के पावसाची तूट पडली. मात्र, सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी (दि.१) काही मंडळात ३० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. आगामी काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, तुटीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही तूट येणार आहे.

जिल्ह्यात यंदा जूनमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला. प्रत्यक्षात जूनच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात काही भागात पावसाने हजेरी लावली तर जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे जून, जुलै या दोन महिन्यांत २६४.० मिमीच्या तुलनेत ३६१.२ मिमी म्हणजे १३६.८ टक्के पर्जन्यमान होण्याचा विक्रम झाला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने उसंत घेतली. जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस पडला. उर्वरित ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण होते. प्रत्यक्ष पावसाची हुलकावणी मिळत आहे. परिणामी गत २८ दिवसांत तुळजापूर, परंडा, उमरगा, लोहारा तालुक्यातच ६८.७ टक्केच पर्जन्यमान झाले तर उस्मानाबाद, कळंब, भूम, वाशी तालुक्यात केवळ ढगाळ वातावरण होते. पावसाच्या खंडाने फुल व फळधारणेच्या काळात पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तूट येणार आहे. खरिपातील मोठी तूट भरून काढण्यासाठी सर्वदूर मोठ्या पावसाची आस लागली आहे. सध्या दमदार पावसाचे वातावरण निर्माण होत आहे, मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

मोठ्या तुटीची शक्यता
ऑगस्टमधील पावसाच्या तुटीने जून, जुलैमध्ये १३६.८ टक्क्यांवर असलेली पावसाची सरासरी ऑगस्टमधील तुटीमुळे ७२.१ टक्क्यावर खाली आली आहे. मात्र, जुलै महिन्यातील अतिवृष्टी व कमी वेळेत अधिक पावसामुळे एकूण सरासरी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिकांचे नुकसान झाले. आता पावसाची तूट पडल्याने पुन्हा पिकांना फटका बसत आहे. पुढे पाऊस चांगला होणार असल्याने पावसाची तूट भरून निघेल, अशी अपेक्षा हवामान तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना वर्तवली आहे. त्याप्रमाणे १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील जागजी, आसु, भूम, येरमाळा, नारंगवाडी, मुळज यासह अन्य १५ मंडळामध्ये २० ते ५० मिमी दरम्यान पाऊस झाला आहे.

आगामी काळात चांगला पाऊस
जिल्ह्यात आठ दिवसांपासून सूर्य तळपत असून उकाडा वाढला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. बाष्पयुक्त ढग खेचून येत आहेत. त्यामुळे आजपासून अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे. मात्र, जेथे पोषक वातावरण तेथेच पाऊस पडेल.
-नकुल हारवाडीकर, कृषी हवामान शास्त्रज्ञ.

बातम्या आणखी आहेत...