आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आंतरजिल्हा बदलीतून 35 शिक्षक जिल्ह्याबाहेर ; निम्मे शिक्षक नांदेडमध्ये

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अनेक गतिरोधक पार करत अखेर पूर्णत्वास गेली आहे. या प्रक्रियेतून जिल्ह्यातील ३५ शिक्षक बाहेर गेले आहेत. १४ शिक्षक जिल्ह्यासाठी नवीन मिळाले आहेत. ९५ शिक्षकांना मनाजोगा जिल्हा न मिळाल्यामुळे त्यांना बदली प्रक्रियेमध्ये स्थान मिळू शकले नाही. तसेच तीन शिक्षकांनी अचूक माहिती न भरल्यामुळे त्यांचे अर्ज अगोदरच फेटाळण्यात आले हाेते.

आतंरजिल्हा बदली प्रक्रियेला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली. परंतु, विदर्भातील प्राथमिक व माध्यमिकच्या घोळामुळे पोर्टल सुरू होण्यास विलंब झाला आहे. यामुळे सुमारे दोन आठवड्यांपेक्षाही अधिक कालावधीपर्यंत शिक्षकांना आपले ऑनलाइन अर्ज भरता आले नाहीत. अखेर गेल्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यातील १३३ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले होते. यामध्ये तिघांनी योग्य व अचूक माहिती न भरल्यामुळे त्यांचे अर्ज अगोदरच बाद ठरवण्यात आले हाेते. नंतर उर्वरित १३० शिक्षकांची बदलीची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये मंगळवारी कोणाची बदली झाली, याची माहिती जाहीर करण्याात आली. त्यानुसार ३५ शिक्षकांची बाहेर बदली झाली आहे. १३० पैकी ९५ शिक्षकांना त्यांच्या मनाजोगा जिल्हा मिळाला नाही. यामुळे त्यांची जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची संधी हुकली आहे. आता त्यांना पुढील बदली प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

१४ नवीन गुरुजी : आंतरजिल्हा प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्ह्याला १४ नवीन गुरूजी मिळाले आहेत. यामध्ये औरंगाबादहून तीन, रत्नागिरी, वाशीम येथून प्रत्येकी दोन, बीड, बुलढाणा, सोलापूर, जळगाव, नाशिक, नागपूर, पालघर येथून प्रत्येकी एक शिक्षक जिल्ह्यात येऊ शकले आहेत.

१६ जण गेले एकट्या नांदेडमध्ये
येथून नांदेड जिल्ह्यात तब्बल १६ शिक्षक गेले आहेत. विशेष म्हणजे सर्वजण एसटी प्रवर्गातील आहेत. सर्वाधिक २१ शिक्षकच जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात गेले आहेत. पुण्याला चार तर सांगलीला तीघे गेेले आहेत. परभणी, बीड, लातूरला प्रत्येकी दोघे, नागरपूर, जालना, सातारा, रायगड, वाशिम व औरंगाबादला प्रत्येकी एका शिक्षकाची बदली झाली आहे.

जिल्ह्याला तोटाच
समायोजन प्रक्रियेमध्ये सुमारे २९० शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे समोर आले होते. आता यात आणखी ३५ जागांची भर पडली आहे. म्हणजे आता ३२५ पर्यंत रिक्त जागांची संख्या पोहोचली आहे. यामध्ये केवळ १४ शिक्षक आले आहेत. म्हणजे ३११ जागा अद्यापही रिक्त आहेत. तसेच जिल्ह्यात अतिरिक्त झालेले १५७ शिक्षक आहेत. त्यांचे समायोजन झाले तरी निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्तच राहतील.

बातम्या आणखी आहेत...