आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गतवर्षीच्या तुलनेत आंब्यांच्या दरात 40 टक्के वाढ; यंदा वातावरणील बदलामुळे गावरान आंब्यांची अजूनही प्रतीक्षा, परराज्यांतील आंब्यांचे दर चढे

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा महागाईमुळे आंब्याचा गोडवा सामान्यांसाठी आंबट झाला. त्यात गावरान आंबे दुर्मिळ झाले आहेत. गतवर्षी रसाचे आंबे प्रति किलो ६० ते १२० रुपये होते तर यंदा १५० ते ३०० रुपये किलोने विक्री होत आहे. वातावरणातील बदलामुळे अद्याप स्थानिक आंबा बाजारात दाखल झाला नाही. यामुळे परराज्यातील आंब्याचे दर चढे आहेत. स्थानिक आंबा बाजारात आल्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस झाला होता. यामुळे एक महिना रब्बी हंगामासही उशिरा झाला. तसेच जिल्ह्यातील आंब्यांनाही उशिरा मोहर लागला. त्यामुळे तब्बल एक ते दीड महिना आंबे उशिरा लागले. यामुळे अद्याप बाजारात स्थानिक गावरान आंबा दाखल झाला नाही. जिल्ह्यातील नागरिकांनीही अक्षय तृतीयेचा सण राज्याबाहेरील आंब्यांच्या रसावर साजरा केला. मात्र, नैसर्गिकरित्या न पिकलेल्या आंब्यांचा रस शरीराला घातक आहे. यामुळे बहुतांश नागरिकांनी पूजेसाठी आंब्यांची खरेदी केली होती. बाजारात सेजाला आलेले गावरान आंबे अद्याप दाखल झाले नाहीत.

त्यामुळे राज्याबाहेरील आंब्याचे दर अधिक आहेत. पूर्वी सेंद्र्या, साखऱ्या, ककडी, शेप्या, गोटी, कागदी, आंबट्या यासह अनेक आंब्याची चवीनुसार नावे होती. ग्रामीण भागात तर विविध प्रकारच्या आंब्यांचे उत्पादन व्हायचे. सध्या आमराई ही संकल्पना मोडित निघाली असून शेतात मोजकीच आंब्यांची झाडे दिसत आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यात आंबा उत्पादनावर होत आहे. फळबाग लागवड योजनेंतर्गतही फळांची रोपे खरेदी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात फळ बागांचे प्रमाण कमी आहे. परंतु, शेतात काही प्रमाणात केशर आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या आंब्यांचा वापर घरच्यांसाठी करणारे बहुतांश शेतकरी आहेत. आमराई राहायची तशा आमराई आता उद्ध्वस्त होत आहे. सध्या बाजारात हापूस, पायरी यासह अन्य परराज्यातील आंबे अनैसर्गिकरित्या पिकवून विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे त्याचा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

केशर, हापूस दीडशे ते ३०० रुपये किलो, स्थानिक आंबा आल्यावर दर घटणार
यावर्षी आंब्यांचा सिझन एक महिन्याने उशिरा असल्याने अद्याप सेजाला आलेल्या गावरान आंब्यांच्या रसाची चव चाखता येणार नाही. स्थानिक गावरान आंबा बाजारात नसल्याने परराज्यातील आंब्यांचे दर गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढले आहेत. गतवर्षी गावरान आंबे ६० ते १२० रुपये किलो होते. तसेच केशर, पायरी, बदाम, हापूस, तोतापूरी ८० ते १५० रुपयांपर्यत होते. मात्र, यंदा राज्याबाहेरील आंब्याचे दर १५० ते ३०० रुपये किलोपर्यंत आहेत. यातील बहुतांश आंबे अनैसर्गिक पद्धतीने पिकवल्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात स्थानिक आंब्यांची आवक नसल्याने राज्याबाहेरील आंब्याचे दर अधिक आहेत. सध्या बदाम १२० ते १५० रुपये किलोने विक्री होत आहेत. केशर, हापूस १५० ते ३०० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. काही दिवसांत स्थानिक आंबे बाजारात दाखल झाल्यास काही प्रमाणात दर कमी होऊ शकतात. एस. के. तांबोळी, विक्रेता.

बातम्या आणखी आहेत...