आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाताळ आणि सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानने ४ हजार अतिरिक्त ऑफलाइन दर्शन पास उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वीच्या ८ हजार ऑफलाइन दर्शन पासव्यतिरिक्त हे ४ हजार ऑफलाइन पास असणार आहेत. यामध्ये ८ हजार दर्शन पास सकाळी ५ ते दुपारी ४ या वेळेत तर उर्वरित ४ हजार दर्शन पास दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचे रविवारपर्यंतचे ऑनलाइन दर्शन पास संपले आहेत.
जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले तुळजाभवानी मंदिर, राज्य शासनाच्या निर्देशानुसार दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. या वेळी फिजिकल डिस्टन्सिगची खबरदारी म्हणून दिवसाला केवळ ८ हजार दर्शन पासची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, सध्या नाताळ आणि त्याला जोडून आलेल्या सुट्यांमुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. वाढलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानने दररोज ४ हजार अतिरिक्त दर्शन पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरराेज ४ हजार अतिरिक्त भाविकांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. ऑफलाइन दर्शन पास घाटशीळ रोड येथील १०८ भक्त निवास व आठवडा बाजार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाताळ आणि सलग सुट्यांचा योग साधत मोठ्या संख्येने चाकरमाने बाहेर पडल्याने तुळजाईनगरी गजबजली आहे. मात्र, मर्यादित दर्शन पासमुळे अनेक भाविकांना महाद्वारासमोरच माथा टेकून शिखर दर्शनावर समाधान मानावे लागत आहे. दरम्यान, भाविकांच्या गर्दीमुळे महाद्वार परिसर भाविकांनी फुलला असून बाजारपेठेतही उत्साह संचारला आहे.
रविवारपर्यंतचे ऑनलाइन बुकिंग फुल्ल
मंदिर संस्थानने www.shreetuljabhavani.org या संकेतस्थळावर ऑनलाइन दर्शन पास बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंदिर संस्थानच्या या ऑनलाइन दर्शन पास बुकिंग सेवेचा लाभ भाविक मोठ्या संख्येने घेत आहेत. रविवारपर्यंतचे (दि. २७) दर्शन पास बुकिंग गुरुवारी सायंकाळीच फुल्ल झाले होते.
तुळजापुरातील स्थिती अशी
१७,००० - दररोज भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ
४,००० - ऑनलाइन दर्शन पास
१२,००० - मोफत दर्शन पास
१,००० - सशुल्क दर्शन पास
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.