आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोळ मिटला:407 शाळा संचमान्यतेत त्रुटी; सीईओ यांची निर्दोष प्रकिया, 84 शिक्षक वाढले

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षांपासून प्राथमिक व नऊ वर्षांपासून माध्यमिक शाळांमधील आॅनलाइन संचमान्यतेचा घोळ अखेर मिटला असून यामुळे जिल्ह्यात ८४ शिक्षकांच्या पदाची वाढ झाली. तब्बल ४०७ शाळांच्या माहितीत त्रुटी असल्याने ऑनलाइन संचमान्यताही त्रुटीयुक्त बनली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वत:च्या अधिकारात ऑफलाइन संचमान्यतेला मान्यता दिली. यामुळे आता शिक्षकांची बदली प्रक्रिया सुलभ होणार आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे तसेच सर्वत्रच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे शिक्षकांनी यु डायस सिस्टिममध्ये विद्यार्थ्यांची संख्या नोंदवलीच नाही. यामुळे ऑनलाईन पोर्टलवर संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची शुन्य संख्या गृहित धरण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील १०३२ पैकी तब्बल ३८३ प्राथमिक शाळांच्या संचमान्यतेत त्रुटी निर्माण झाली. तसेच २४ जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्येही २०१४ पासून असाच काहीसा प्रकार झाला होता.

१६ जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना गुरुजी
संचमान्यतेतील त्रुटी दूर झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. जिल्ह्यात झेडपीचे केवळ ५३ माध्यमिक प्रशाला आहेत. यापैकी अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागा होत्या. मात्र, संचमान्यताच नसल्यामुळे समायोजन करता येत नव्हते. आता १६ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी आहेत परंतु, शिक्षकच नाहीत. तेथे आता शिक्षक उपलब्ध झाले आहेत.

त्रुटींमुळे अडचणी, आता सुलभ प्रक्रिया
शिक्षकांच्या संच मान्यतेमध्ये अनेक त्रुटी होत्या. यामुळे बदली व समायोजन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. आता ऑफलाइन पद्धतीने संचमान्यता तयार करण्यात आली असून सर्व प्रक्रिया सुलभ होतील. शिक्षकांनाही यातून योग्य न्याय मिळणार आहे. राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद

अशी तयार होते संचमान्यता
दरवर्षी ३० सप्टेंबरला शाळेत उपलब्ध पटसंख्या ऑनलाइन नोंदवली जाते. यावरून ग्रामविकास विभागाच्या पोर्टलवर विद्यार्थीसंख्या नोंदली जावून जिल्ह्याची एकत्रित संचमान्यता तयार होते. यामध्ये शिक्षकांची रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकही दाखवले जातात. शिक्षकांची बदली, समायोजन, डेप्युटेशन आदी प्रक्रियेसाठी संचमान्यता वापरण्यात येत असते. यामुळे संचमान्यतेला मोठे महत्त्व आहे. सध्या शिक्षण विभागाने ऑफलाइन संचमान्यता बनवली आहे.

सीईओंच्या पत्रात ईटच्या शाळेचे उदाहरण
सीईओ गुप्ता यांनी उपसचिवांना पाठवलेल्या पत्रात ईट (ता. भूम) येथील जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण दिले आहे. यामध्ये सध्या या शाळेत पहिली ते पाचवीसाठी केवळ एक शिक्षक मान्य आहे. मात्र, शासन निर्णयाप्रमाणे येथे १६ पदांना मान्यता मिळू शकते. तसेच सहावी ते आठवीसाठी ५ पदांना मान्यता आहे. परंतु, नियमाने १० तसेच नववी व दहावीसाठी सध्या चार शिक्षकांसाठी मान्यता आहे. प्रत्यक्षात ७ पदांना मान्यता मिळू शकते. येथे १०३९ विद्यार्थ्यांसाठी केवळ १० पदे मान्य आहेत.

बातम्या आणखी आहेत...