आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:चिवरीच्या शेतकऱ्यास सापडलेले 42 हजार अणदूरच्या शेतकऱ्यास परत

अणदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका शेतकऱ्यास रस्त्यावर सापडलेले ४२ हजार रुपये संबधित शेतकऱ्यास घरपोच परत केल्याने चिवरी येथील बाबुराव शिंदे यांचा अणदूरकरांनी सत्कार केला. येथील शेतकरी अशोक कांबळे कुटुंबीयांसह चिवरी रस्त्यालगतच्या शेतात राहतात. शुक्रवारी (दि.४) येथील स्टेट बँकेतील खात्यातून त्यांनी सावकाराचे देणे फेडण्यासाठी ४२ हजार रुपये काढले व पासबुकासह ती पिशवी पत्नीकडे दिली. दुचाकीवरून शेताकडे जाताना वाटेत पिशवी हरवल्याचे शेतात गेल्यावर लक्षात आले. चिवरी येथील शेतकरी बाबुराव नागनाथ शिंदे गावाकडे जाताना त्यांना रस्त्याच्या कडेला पिशवी पडल्याचे दिसले, त्यात पासबुक व ४२ हजार रुपये होते. पासबुकवरून खात्री पटल्याने त्यांनी कांबळे यांचे घर गाठले. परत एकदा खात्री करून रकमेसह पिशवी कांबळे यांच्या स्वाधीन केली.

प्रामाणिकतेची माहिती समजताच येथील अमोल महाबोले व आर. एस. गायकवाड यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधून शनिवारी (दि.५) येथील बसस्थानकात त्यांचा सत्कार करून पेढे वाटले. आभार व्यक्त करताना अशोक कांबळे यांना गहिवरून आले. याप्रसंगी अमोल महाबोले, सामाजिक कार्यकर्ते आर. एस. गायकवाड, चिवरी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, धनराज कांबळे, बाळू कर्पे, मारुती बागडे, बालाजी पापडे, शिवशरण पाटील, कंट्रोलर गवळी, लक्ष्मण लंगडे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...