आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीची वारी:आषाढीसाठी एकत्रित बुकिंग करणाऱ्या 45 वारकऱ्यांना मिळणार स्वतंत्र बस; जिल्ह्यातील सहा आगारांमधून 185 एसटी बसेसची सुविधा

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसह एसटी महामंडळ विभागही सज्ज झाला आहे. वारीत न जाता येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्ह्यातील सहा आगारातून १८५ एसटी बसेसची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याच बरोबर ४५ जणांनी एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. वारकऱ्यांकडून मागणी करण्यात येईल, त्यावेळी या बसेस उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो वारकऱ्यांच्या विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागली आहे. हजारो वारकरी दिंडी सोहळ्यासोबत पंढरीकडे रवाना झाले आहेत. मात्र, अनेक वारकऱ्यांना वारी मध्ये जाणे शक्य होत नसल्याने त्यांना माऊलीच्या दर्शनासाठी महामंडळाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्हाभरातून विविध मार्गाहून आणि आगारातून १८५ बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

टप्प्याटप्याने या बसेस पंढरपूरसाठीच सोडण्यात येणार आहेत. या सर्व बसेस विशेष प्रासंगिक म्हणून नियोजित असणार आहेत. एकत्रित बुकिंगच्या बसेसमध्ये पूर्ण सीट भरलेले असल्यास या बसेस थेट असणार आहेत. अथवा त्या नॉन स्टॉप पंढरपूरला जाऊ शकणार आहेत.

तुळजापूर आगारातून सर्वाधिक बसेस
जिल्ह्यातील सहा आगारातून आषाढी वारीसाठी नियोजन करण्यात आले असले तरी, सर्वाधिक बसेस या तुळजापूर आगारातून सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक आगारातून नियोजन असले तरी, तुळजापूर आगारातून तब्बल ४० बसेसची सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध असणार आहे. जवळील आगारातून जास्तीच्या तर लांबच्या आगारातून सोयीनुसार या बसेस फेऱ्या मारणार आहे. सहा जूनपासून या बसेस पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. दुसरीकडे आवश्यकतेनुसार अथवा वारकरी संख्या जास्तीची असल्यास तेथूनही त्यांच्या सोयीसाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी
वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध आगारातून बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही मार्गावरील वारकऱ्यांना ज्यांना दिंडीत जाणे शक्य झाले नाही, अशा भाविकांना बसेसने पंढरपूरला जाणे शक्य होणार आहे. एकत्रित बुकिंग केलेल्या भक्तांनाही स्वतंत्र बस उपलब्ध असणार आहे. यासाठी वारकऱ्यांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा.
-पांडुरंग पाटील, आगार प्रमख, उस्मानाबाद.