आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन बसेस मिळणार:जिल्ह्यासाठी मिळणार नवीन 50 - 60 बसेस; वाहनांसह चालकही कंत्राटीच

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील रस्त्यावर धावणाऱ्या अनेक बसेस या कालबाह्य झाल्या असल्या तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने महामंडळाकडून या बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकदा बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, आगामी काही दिवसात जिल्ह्यातील सर्व आगारांसाठी ५० ते ६० नवीन बसेस मिळणार असून या बस कंत्राटी असणार आहेत.

त्यातून २० ते २५ बसेस उस्मानाबाद आगारास मिळणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या बसेस कंत्राटी असल्याने वाहनांसोबत चालक ही मिळणार आहेेत. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील आगारातील बसेसची वाताहत झाली आहे. त्यामुळे सध्या नियमित बसेस बंद पडण्याचे प्रकार सुरु आहेत.

रोज कार्यशाळेत चारहून अधिक बस दुरुस्तीसाठी लागल्याचे दिसते. तसेच उस्मानाबाद आगारातील ८४ पैकी १२ बसेस मुख्य कार्यशाळेत लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर ७२ बसेस धावत आहेत. यातूनही अनेक बस या विशेष कराराने लग्न, सहल आणि अन्य कामासाठी जात असल्याने अनेक मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत असते. जिल्ह्यातील सर्वच आगारात हिच परिस्थिती आहे.

जिल्ह्यात नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळण्यासाठी ५० गाड्यांचा प्रस्ताव शासनाला काही महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही. उलट कराराने खासगी बसेस उपलब्ध करुन घेतल्या असल्याचे चित्र दिसून येत आहेत. काही दिवसांत या बसेस उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

बसेसबाबत मागील दोन महिन्यांपूर्वीच आता असलेल्या बसेस व त्याची स्थिती अशी सर्व माहिती यापूर्वीच महामंडळाच्या मुख्य कार्यालयास कळवली आहे. बसेस कोणत्याही असाव्या, मात्र, चांगल्या दर्जाची सेवा त्यांनी द्यावी, अशीच माफक इच्छा जिल्हाभरातील प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लातूरला दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्या कंत्राटी बस
शहरापासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी या कंत्राटी बसेस मिळाल्या आहेत. अधून मधून त्या उस्मानाबाद आगारासह अन्य आगारातही फिरत आहेत. त्यावर वाहक केवळ महामंडळाचा नियुक्त केलेला आहे. आपल्या जिल्ह्यातही लवकरच या बसेस मिळणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, बसेस कधी मिळणार याबाबत, निश्चित अशी कोणतीच माहिती समोर येऊ शकली नाही. दुसरीकडे या बसेसची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

वाहनासह चालकही कंत्राटी आता मिळणाऱ्या बसेस या कंत्राटी (करार पद्धतीने) तत्वावर खासगी कंपनीकडून घेतल्या आहेत. या वाहनांसोबत बसेस वर त्यांचा नियुक्त केलेला चालक असणार आहे. त्यामुळे आगारातील चालकांचे मनुष्यबळ महामंडळाकडे उपलब्ध असणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील इतर बसेससाठी करता येणार आहे.

आगाराला बस मिळणार असल्याने दिलासा
महामंडळाकडून उस्मानाबाद आगार व जिल्ह्यासाठी नवीन कंत्राटी बसेस मिळणार असल्याचे संकेत आहेत. यासंबंधी अद्याप लेखी माहिती मिळाली नाही. मात्र, तशी चर्चा सुरु आहे. यामुळे प्रवाशांसह वाहक-चालकांना जुन्या बसपासून सुटका मिळणार आहे. यातून प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. -बाळासाहेब कदम, कार्यशाळा प्रभारक, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...