आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील ३१ हजार ९४२ शेतकऱ्यांचे ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान लटकले असून ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक आहे फक्त तेथील शेतकऱ्यांची नावे वगळून यादी प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना वेठीस ठरले. दरम्यान, पहिल्या यादीतील ३४ हजार ४७१ शेतकऱ्यांना १०१ कोटी ६० लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
नियमित दोन वर्षे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वीच जाहीर केली होती. पहिली यादी १३ ऑक्टाेबर २०२२ रोजी जाहीर झाली. योजनेसाठी जिल्ह्यातील ७१ हजार ३९४ शेतकऱ्यांची यादी विविध बँकांनी पाठवली होती. मात्र, यात पहिल्या यादीत यापैकी ३९ हजार ४५२ शेतकऱ्यांचा समावेश केला होता. उर्वरित ३१ हजार ९४२ शेतकऱ्यांची यादी नंतर येणार, असे सांगितले होते.
डिसेंबरमध्ये यादी येणार, अशी चर्चा होती. राज्य शासनानेही जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक माहिती मागवली होती. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यादीची प्रक्रिया थांबली. सुरूवातीला ९ डिसेंबरपर्यंत यादी येणार, असे सांगितले. ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावातील शेतकरी वगळून अन्य गावातील शेतकऱ्यांची यादी घोषीत करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, तशीही यादी आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
अगोदरच मोठा विलंब
सरकारने घोषणा केल्यानंतर मोठ्या कालावधीनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी मोठा वेळ यासाठी लागला होता. यामुळे शेतकऱ्यांना याचा वेळेवर लाभ झाला नाही. आता दुसऱ्या यादीसाठी मोठा वेळ जात आहे. आता ग्रामपंचायत व पुन्हा कोणत्याना-कोणत्या निवडणुका येतील. यामुळे यादी जाहीर करणे पुढेच रेटणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
पहिल्या यादीतील बहुतांशांना लाभ
पहिल्या यादीमध्ये ३९ हजार ४५२ शेतकऱ्यांची नावे समावेशीत करण्यात आली होती. यापैकी ३८ हजार २९४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. यापैकी ३४ हजार ४७१ शेतकऱ्यांना १०१ कोटी ६० लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मात्र, ११५८ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही.त्यामुळे त्यांची प्रकिया रखडली आहे. व्यक्तिगत संपर्क साध्ून त्यांना प्रक्रिया करण्यास सांगण्यात येत आहे. त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे.
३४० तक्रारींचे निराकरण, उस्मानाबाद तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी
प्रक्रिया करूनही पैसे न मिळणे, अपेक्षित अनुदान प्राप्त न होणे अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यात जिल्हास्तरीय ३४४ तक्रारी आल्या होत्या. यामध्ये २०४ तक्रारींचे निवारण झाले. १४० तक्रारी प्रलंबित आहेत. तालुकास्तरीय २६७ तक्रारी होत्या. यापैकी १३६ तक्रारींचे निवारण केले. १३१ तक्रारी प्रलंबित आहेत. यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यातून आल्या आहेत.
१६६ गावांत निवडणूक
जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. निवडणूक प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यानंतर या गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, या शेतकऱ्यांची तसेच अन्य शेतकऱ्यांचीही यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.
प्रक्रिया सुरू, लवकर यादी येणार
लवकरच शेतकऱ्यांची यादी घोषित केली जाणार आहे. याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुका सुरू असलेल्या ठिकाणचे शेतकरी वगळून यादी घोषीत होणार . योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. -सुनिल शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.