आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या शाळांमधील केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहे. उर्वरित ५० टक्के पदे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांसाठीच्या केंद्रप्रमुख भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप ही जाहीर करण्यात आले. पदोन्नतीने नियुक्तीसाठी शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता याद्वारे निवड होईल. कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल. पदोन्नतीच्या कोट्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे असल्यास ती पदे रिक्त होत जातील तशी स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीसह स्पर्धा परीक्षांसाठी अभियोग्यता व बुध्दीमापन चाचणी होईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेतली जाईल. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेता परीक्षा आयोजित केली जाईल.
परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात येईल. या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे असेल तर किमान ५० टक्के गुणांसह पदवी आणि शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक परीक्षेसाठी पात्र असतील. जिल्हा परिषदेचे शिक्षक कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यासाठी पात्र असतील असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत म्हणाले, रिक्त केंद्रप्रमुख पदे भरल्याने शैक्षणिक दर्जा सुधारून गुणवत्ता वाढत आहे, त्या शिक्षकांकडे अतिरिक्त केंद्रप्रमुखाचा पदभार असल्याने मूळ वर्ग अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन इतर प्रशासकीय कामकाजाचा ताण वाढत असल्याने शिक्षकांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सदरील केंद्रप्रमुख भरतीने कमी होण्यास मदत होईल आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस बळ मिळेल.-
विभागीय मर्यादित परीक्षेव्दारे अन्य पदे भरणार राज्य परीक्षा परिषदेमार्फत विभागीय मर्यादित परीक्षा आयोजित करण्यात येणार असून प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषद शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मदत होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी उपस्थिती टिकवणे, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा निर्माण करण्यात आल्या. दहा शाळांसाठी एक केंद्र याप्रमाणे राज्य सरकारने २०१० मध्ये केंद्रप्रमुख भरतीसाठी सरळसेवा, पदोन्नती, मर्यादित भरती परीक्षेसाठी ४०:३०:३० असे प्रमाण निश्चित केले होते. त्यानुसार २०१४ मध्ये ग्रामविकास विभागाने केंद्र प्रमुखांची सेवा प्रवेश नियम, २०१७ मध्ये कार्यपद्धती निश्चित केली. कार्य पद्धतीनुसार पदे भरली जात नसल्याचे दिसल्याने भरतीचे प्रमाण बदलण्यात आले आहे. त्यानुसार आता ५० टक्के पदे पदोन्नतीने आणि ५० टक्के पदे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.