आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:दोन दिवसांत आले 5200 टन खत, आणखी खेप येणार, बळीराजाला पावसाची प्रतीक्षा; जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी पुन्हा लांबणार

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन दिवसात रेल्वेने जिल्ह्यासाठी ५२०० मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. पुढील आठवड्यात आणखी खत उपलब्ध होणार असल्यामुळे मुबलक खत मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे पेरण्यासाठी अडचणी आल्या आहेत. तसेच सोयाबीनचे बियाणे मिळवण्यासाठीही शेतकऱ्यांची त्रेधा उडत आहे.

जिल्ह्यात यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. सुमारे पावने सहा लाख हेक्टरवरून आता सहा लाख पाच हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची अपेक्षा आहे. याच्या तुलनेत खताचे आवंटनही वाढवण्यात आले आहे. ७५ हजार २७० मेट्रीक टनाची मागणी करण्यात आली आहे. याला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यानुसार हळूहळू खताची उपलब्धता होत असल्याचे दिसत आहे. डीएपी खताची मागणी अधिक असतानाही सर्वच प्रकारचे खते उपलब्ध होत आहेत. रविवारी व सोमवारी खताच्या पोत्यांनी खचाखच भरलेल्या रेल्वेच्या मालगाड्या रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आल्या आहेत. रविवारी २६०० तर सोमवारीही २६०० मेट्रीक टन खत उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून सातत्याने डीएपीची मागणी होत असते. मात्र, सध्या १०:२६:२६ व २०:२०:१३ खत उपलब्ध झाले आहे. येत्या आठवड्यात आणखी खत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागातील अधिकारी विविध मार्गाने प्रयत्न करत आहेत. दुकानदारांनी खत मिळण्यासाठी रक्कम भरून मागणी नोंदवण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे. सध्या बहुतांश शेतकरी ऐनवेळी पेरण्यासाठी खताचा साठा उपलब्ध करून ठेवत आहेत.

बियाण्यांचाही जाणवणार तुटवडा
खताप्रमाणे सोयाबीनच्या बियाणांचाही तुटवडा आहे. किमान दोन लाख ७० हजार क्विंटल बियाणांची गरज असताना महाबीजकडून केवळ ४५०० क्विंटल बियाणे मिळण्याची शक्यता आहे. गतवर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात महाबीजचे प्लॉट वाहून गेले. आता केवळ घरगुती बियाणांवर भिस्त आहे. काही जिल्ह्याबाहेरील व्यापारी गावोगाव बियाणे विकत आहेत. परंतु, उगवण क्षमतेची खात्री करूनच बियाणे घेण्याची गरज आहे.

पाऊस लांबल्यामुळे चिंता
जिल्ह्यात सध्या सर्वत्र काळेकुट्ट ढग दिसत आहेत. पाऊस पडत नसल्यामुळे अडचणी वाढल्या. पहिल्या टप्प्यात अपेक्षित पैकी निम्माही पाऊस झाला नाही. गतवर्षीही मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. नंतर ओढ दिली होती. नंतर पेरणीयोग्य पाऊस झाला व ऑगस्टमध्ये तर २२ दिवसांचा खंड निर्माण झाला.

डीएपीला अधिक पसंती
प्रत्येक पिकांसाठी डीएपी खताची मागणी अधिक असते. त्यातल्या त्यात सोयाबीनसाठी अधिक आग्रह धरला जातो. सोयाबीनचे क्षेत्र पावणेचार लाख हेक्टर असून किमान ४६ हजार मेट्रीक टन डीएपी खताची मागणी असते. परंतु, प्रशासनाने केवळ १८ हजार ७०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर केलेे. मंजूर खतही उपलब्ध होत नाही.

ब्लॉगवर ऑनलाइन पाहणी करून मागणी करा
कोणत्या निविष्ठा विक्रेत्यांकडे किती खताचा साठा शिल्लक आहे, याची माहिती उपलब्ध होण्यासाठी ब्लॉग तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची ब्लॉगवर पाहणी करूनच दुकानदाराकडून खताची मागणी करावी. काही अडचण असेल तर कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
महेश तीर्थकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...