आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्तीत आधार:65 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी 59 कोटींचे वाटप सुरू

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाकडून ५९ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मागील महिन्यातच मंजूर झाला होता. नुकताच महसूल प्रशासनाला निधी मिळाला असून अनुदान वाटप अंतिम टप्यात आहे. दोन दिवसांत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले.

यंदा खरिपात अतिवृष्टी झाली. मान्सूनच्या मध्यंतरी जिल्ह्यातील काही तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रारंभीच्या नुकसानीचा आढावा घेऊन प्रशासनाने ज्या तालुक्यात नुकसान झाले, त्याचा अहवाल शासनाला पाठवला होता. त्यानुसार अनुदान मिळाले होते, वाटपाची पक्रिया सुरू करताना काही तालुक्यात परतीचा पाऊस कोसळला. नंतर झालेल्या पावसाचे पंचनामे उशिरा करुन त्यांचा अहवाल पाठवण्यास विलंब झाला होता. मात्र, सरसकट नुकसान भरपाईची मागणी झाल्याने पुन्हा हा निधी मंजूर केला होता. त्याचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे.

आतापर्यंत मिळाला ३०५.७७ कोटी रुपयांचा निधी
जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमिनीवरील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची माहिती शासनाला कळवण्यात आली होती. त्यानुसार शासनाकडून आतापर्यंत गोगलगायींमुळे नुकसान, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी ३०५.७७ कोटींचा निधी शासनाकडून देण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या दोन्ही टप्प्यांचे वाटप करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्याचे वितरण सुद्धा अंतिम टप्यात आले आहे.

२ दिवसांत वाटप होईल
शासनाकडून सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्याच्या नुकसान भरपाईसाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने निधी मंजूर केला होता. मात्र, प्रत्यक्ष अनुदान विलंबाने दिले. निधी प्राप्त होताच वितरण सुरू केले. दोन दिवसांत वाटप पूर्ण होईल. -शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी.

२ हेक्टर:३८ हजार शेतकरी
आता तिसऱ्या टप्प्यातील निधीचा लाभ दोन हेक्टर बाधित शेतकऱ्यांच्या पाच तालुक्यातील ३८ हजार ३२२ हेक्टर क्षेत्राला मिळाला. दोन तालुक्यातील दोन ते तीन हेक्टर दरम्यान शेत बाधित ५६२० हेक्टर क्षेत्रासाठी निधी मिळाला असून त्याचे वाटप करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...