आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजुरीचे निघाले आदेश:अतिवृष्टीने नुकसानीचे 59 कोटी 87 लाख मंजुरीच्या 20 दिवसांनंतरही अप्राप्तच

उस्मानाबाद / हरेंद्र केंदाळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी दोन नोव्हेंबर रोजी शासनाने विशेष ऑर्डर काढून ५९ कोटी ७८ लाख रुपये मंजूर करुन वाटपाचे आदेश काढले होते. मात्र, २० दिवसांनंतरही शासनाकडून निधी मिळालाच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे शासनाने उस्मानाबाद वगळता अन्य जिल्ह्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी १२८६ कोटी ७४ लक्ष ६६ हजार रुपये मंजुरीचे आदेश दिले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्ह्याचा मंजूर व इतर जिल्ह्याचा निधी दोन्ही सोबतच मिळणार असल्याचे समोर आल्याने संभ्रम दूर झाला आहे.

राज्य शासनाकडून १७ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशामुळे उस्मानाबाद जिल्हा वगळल्या-ची चर्चा रंगली होती. मात्र, दोन नोव्हेंबर रोजी शासनाने अगोदरच जिल्ह्यासाठी निधी मंजूर करुन वाटपाचे आदेशही काढले होते. त्यात केवळ एकट्या उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश होता. इतर एकाही जिल्ह्याला नुकसानीचा एक छदामही मंजूर केला नव्हता. दरम्यान, आमदार कैलास पाटील उपोषणासाठी बसले होते. त्यावेळी त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले होते. त्यामुळे शासनाकडून प्राधान्याने उस्मानाबाद जिल्ह्यास निधी मंजूर केला होता. तसे आदेशही काढले होते. मात्र, निधी मंजूर केला तरी, अद्यापही हा निधी प्रशासनालाच मिळाला नसल्याचे दिसून आले. प्रशासनास निधी मिळाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे निधी मंजूर असूनही निधी मिळाला नसल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहेत. शासनाने निधी मंजुरीचे आदेश दिले असले तरी, अद्याप कोणत्याही जिल्ह्यात त्याचे वितरण करण्यात आले नाही. उस्मानाबाद आणि अन्य जिल्ह्यासाठी एकाच वेळी निधी वितरीत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून कळाले.

आतापर्यंत ३०३ कोटी भरपाई मंजूर यापूर्वी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी ९० कोटी रुपये पहिल्या टप्प्यात तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १५४ कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मिळाले होते. त्याचे वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी आर्थिक मदत झाली. आता पुन्हा अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी अधिकचे ५९ कोटी रुपये अनुदान मंजूर असून लवकरच वितरीत होणार आहे.

अद्याप निधी मिळाली नाही, प्राप्त होताच करणार तत्काळ वितरण शासनाने दोन ऑक्टोबर रोजी आदेश काढून जिल्ह्यासाठी निधी मंजूर केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप हा निधी प्राप्त झाला नाही. निधी मिळताच त्याचे वितरण करण्यात येईल. इतर जिल्ह्यासाठी नव्याने नुकसान भरपाई आदेश काढले आहेत. यात जिल्ह्याचा समावेश नाही. कारण आपल्याला यापूर्वीच निधी मंजूर केला. आपल्या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना निधी सोबतच मिळणार आहे. शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...