आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरविकास:मुंबई-पुणेच्या धर्तीवर शहरामध्ये उभी राहतेय 6 कोटींची आठवडी बाजारपेठ

उस्मानाबाद / हरेंद्र केंदाळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आठवडी बाजाराची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असून पावसाळ्यात तर थेट घाणीतच बाजार भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपरिषदेला नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाताना नाकीनऊ येत होते. मात्र, नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात आठवडी बाजार विकसीत करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून मुंबई-पुण्याच्या धर्तीवर शहरातील आठवडी बाजाराचे रूप घडणार आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यासाठी डेडलाइन देण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांसह पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थांसाठी एकमेव महत्त्वाचा रविवारचा आठवडी बाजार आहे. मात्र, या बाजारातील रस्त्यांसह, ओट्यांसह सुविधांची मोठ्या प्रमाणात वाणवा आहे. तसेच पार्किंग नसल्याने शहरातून जाणाऱ्या सोलापूर- तुळजापूर-औरंगाबाद या मुख्य मार्गावरच दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकींची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करुन येथून वाहने काढावी लागतात. आता लवकरच ही समस्या दूर होणार असून बाजारात विक्री करणाऱ्यांना आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना नगरपरिषदेकडून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी बाजारपेठेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला आहे. त्यावर पीएमसी (प्रकल्प सल्लागार समिती) नेमण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे ही कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

५० चारचाकी, २२० दुचाकींची सोय
बाजारातील ग्राहक, विक्रेते यांच्यासाठी ५० चारचाकी आणि २२० दुचाकींची व्यवस्था असेल. तसेच अत्यंत उष्ण आणि पावसाळ्यातील हवामानाच्या परिस्थितीनुसार संपूर्ण बाजारपेठ झाकलेली असणार आहे. अथवा तशी सुविधा निर्माण करणार आहे. वादळ, ऊन, वारा, पाऊस यापासून सर्वांचे संरक्षण होईल, अशी सुविधा असेल. त्याचबरोबर सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्याची सुविधा असणार आहे. तसेच चांगले रस्ते त्याचबरोबर बाजारात प्रवेश करण्यासाठी विविध मार्गांचेही नियोजन केले आहे.

प्रक्रियेला वेग, निधी मंजूर
नगरविकास विभागाने सहा कोटी रुपये मंजूर केले असून त्यातून शहरात मुंबई -पुण्याच्या धर्तीवर बाजारपेठ विकसीत करत आहोत. जास्तीची कामे नगरपरिषद करणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवत आहोत. आगामी १५ दिवसात निविदा पूर्ण होईल. त्यानंतर कार्यारंभ आदेश देऊ. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सहा महिन्यात काम पूर्ण करायचे आहे. -हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद.

बातम्या आणखी आहेत...