आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील ६ लाख ६८ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी भरला ५१ कोटींचा विमा हप्ता; ५ लाख हेक्टरवरील पिकांना २५४० कोटींचे संरक्षण

बाळासाहेब माने | उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानात अनपेक्षित बदलाने कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एवढ्या संकटावर मात करूनही हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये ओढवणाऱ्या अतिवृष्टीत पाण्यात जाते. यामुळे जिल्ह्यातील ६ लाख ६८ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी ५१ कोटींचा विमा हप्ता भरून ५ लाख हेक्टरवरील पिकांना २५४० कोटीचे विमा संरक्षण घेतले आहे.

असमतोल पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या जोपासणेत अडचणी येतात. यंदा जून महिन्यात आठ दिवस पाऊस झाला अन् १५ दिवस हुलकावणी दिली. त्यानंतर जुलै महिन्यात दररोज पाऊस झाला. यामुळे पिकांची वाढ खुंटली असून रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मेहणतीने जोपासलेले पीक काढणीच्या वेळी अतिवृष्टीत हिरावले जाते. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील ६ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पीकविमा भरला आहे. पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी १ ऑगस्ट शेवटचा दिवस होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनपेक्षित बदल, अति प्रमाणात सरासरीपेक्षा दीड पटीने पडणारा पाऊस, कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप पिकांना बसणारा फटका लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक विम्याचे संरक्षण मिळवले आहे. शेतकरी पिकांची परिस्थिती लक्षात घेता विम्याचे कवच मिळवत आहे. या वर्षी ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, भुईमूग, तूर, तीळ, कराळे, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस, कांदा, ऊस आदी पिकांसाठी हा विमा उतरवला आहे.
ओल्या दुष्काळासह अतिवृष्टीची भीती

जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून पीक काढणीच्या वेळी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे भविष्यातील अतिवृष्टीच्या संकटाचा विचार करून यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा भरुन पिके संरक्षित केली आहेत.

रविवारच्या सुटीमुळे एक दिवस मिळाला वाढवून
विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ अशी होती. ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुटीचा वार असल्यामुळे एक दिवस म्हणजेच १ ऑगस्ट हा एक दिवसाचा वाढीव वेळ मिळाला.

गतवर्षीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भरला विमा हप्ता
नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी यंदा गतवर्षीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा हप्ता भरला आहे. रविवारी सुटी असल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील एक दिवस वाढवून मिळाला होता. दरम्यानच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला आहे. काही बँकांकडून विमा हप्ता अपडेट झाला नसून १५ दिवसांत होईल.
-महेश तीर्थकर, अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...