आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अनाळ्यासह परिसरात दोन तासांत 74 मिमी पाऊस; सांडवा फोडून सोडले पाणी

अनाळा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील अनाळासह परिसरात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन तास मुसळधारमुळे ७४ मिमी पावसाची नोंद झाली. ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले तर शेतातील उडीद, मूग, मका, कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेला उडीद, सोयाबीन, मूग, कांदा आदी पिके भिजल्याने नुकसान झाले. त्वरीत पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला उडीद वाहुन गेला. गावांतील घरे, दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. सगळीकडे पाणीच-पाणी दिसत होते. अनाळा येथील पाझर तलाव तुडुंब भरल्याने फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतू, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जेसीबीद्वारे सांडवा फोडून पाणी सोडून दिल्याने मोठा धोका टळला. दरम्यान, पाझर तलावाच्या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले. यावेळी नायब तहसीलदार सुजित वाबळे, प्रदीप पांडुळे, सरपंच जोतीराम क्षीरसागर, तलाठी महेश मुकदम, उपसरपंच कल्याण शिंदे, भाजप नेते बिभिषण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अजित शिंदे, चांगदेव चव्हाण, अशोक शिंदे, दादासाहेब फराटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाहतूक बंद, शिक्षकांची धांदल :
मुसळधार पाऊसामुळे अनाळा कंडारी-रोहकल गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. शाळेतील मुलांना वस्तीवर पोहोचताना शिक्षकांची धांदल उडाली होती. अनाळा लघु प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. नगोंदा येथील राहुल जगताप यांची म्हैस पाण्यात वाहून गेली आहे. या म्हशीची अंदाजे किंमत ६० ते ७० हजार होती. वाहून गेलेल्या म्हशीचा पंचनामा वैद्यकीय अधिकारी सदानंद टकले व तलाठी महेश मुकदम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...