आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील खरीप हंगाम अतिवृष्टी व परतीचे पावसात गेल्यानंतर रब्बी हंगामातून मुबलक उत्पन्न निघण्याची आशा लागली असताना जवळपास शंभर टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या, मात्र वातावरणातील बदल, धुक्याने रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात आला. सध्या हरभरा व ज्वारीचे पिक सुकून जात असल्यामुळे माना टाकायला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी पिके जगविण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करत पीक जगवण्याची धडपड सुरू केली आहे.
यंदा पावसाने शेवटचे टप्प्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला, तुरीच्या मोसमात बुरशीजन्य रोगामुळे फक्त काळवंडल्याने मुबलक उत्पन्नाची आशा, वातावरण बदलाने मावळली. वातावरण बदलाचा फटका रब्बी हंगामातील पिकांनाही बसत आहे. ज्वारी व हरभरा पीक बहरात असताना पदरमोड करीत शेतकऱ्यांनी महागडे औषधी खरेदी करत फवारणी केली आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे पेरण्यास विलंब होत असल्यामुळे निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी निर्धारित क्षेत्रापेक्षा सर्वाधिक क्षेत्रात रब्बी पेरणी केली. दिवसभर ढगाळ आणि पहाटेच्या सुमारास होणाऱ्या धुक्यामुळे हरभरा पिकांवरील घाटे व हिरव्या अळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी पदरमोड करीत औषध फवारणी करून पिके जगविले. मात्र गेल्या चार दिवसापासून पुन्हा धुक्याचे वातावरण निर्माण होत असल्याने ज्वारी, हरभरा पिके हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. पिकांना जीवनदान देण्यासाठी उपलब्ध पाण्यावर तुषार सिंचन करून हरभरा व ज्वारी पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
याबाबत एकोंडी जहांगीर येथील शेतकरी काशीनाथ बिराजदार म्हणाले की, तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू असून शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते कसेतरी उत्पन्न काढतील. पण ज्यांच्याकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या भरवशावरच सर्व काही अवलंबून आहे. निसर्गा सोबतच हवामान खाते, सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याची चर्चा शेतकऱ्यातून होत आहे. खरीप हंगाम पाण्यात गेल्याने उसने पासने करून रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा पिकाची पेरणी केली. सद्यस्थितीत पाण्याची गरज असल्याने ज्वारी व हरभरा पिके माना टाकत आहेत. उपलब्ध पाण्यावर ज्वारी, हरभरा जगेल या आशेवर तुषार सिंचनाद्वारे पाणी देत आहोत.
सर्वाधिक १२० टक्के क्षेत्रात हरभरा पेरणी, घाटे आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव तालुक्यात यंदा रब्बी पेरणीचे ४४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून ९४ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पीकनिहाय क्षेत्र आणि कंसात पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे. ज्वारी एकूण १६ हजार सातशे हेक्टर (९५००), गहू एकूण पेरणी क्षेत्र दोन हजार ४७५ हेक्टर (२६३५), हरभरा एकूण २० हजार ८४५ हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रात म्हणजे १२० टक्के पेरणी झाली आहे. करडई एकूण पेरणीचे क्षेत्र तीन हजार १४ हेक्टर (२९५२), जवस ४१४ हेक्टर क्षेत्र तर सूर्यफूल एकूण एक हजार ४७० हेक्टर, अन्य बाराशे हेक्टर क्षेत्रात इतर पिकांचा पेरा झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.