आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च न्यायालयात धाव:तक्रार दाखल करणाऱ्यावरही गुन्हा; जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय अपहार प्रकरण, शेख जाणार कोर्टात

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात बनावट लाभार्थी दाखवून लाखो रुपये हडपणाऱ्या सात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये तक्रारदार असलेल्या मनसे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, चौकशीमध्ये शेख यांनीही अपहार केल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात अनागोंदी कारभार, बनावट लाभार्थी दाखवून लाखो रुपये हडप करण्याच्या आरोपात जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी जे. व्ही. मिटके, एस. आर. सोलंकर, वरिष्ठ लिपिक अजिंक्य पवार, कंत्राटी कर्मचारी एम. आर. काकडे, ए. ए. देशपांडे, एस. जी. वैद्य, जी. एस. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

तसेच प्रमोद रामचंद्र कुलकर्णी (उंबरे कोठा, उस्मानाबाद), सय्यद अतीखउल्ला हुसेनी असदउल्ला हुसेनी (खाजानगर, उस्मानाबाद) या लाभार्थींविरोधातही गुन्हा दाखल झाला. दरम्यान मनसे तालुकाध्यक्ष पाशुमिया शेख (महाळंगी, ता. उस्मानाबाद) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाशुमिया या प्रकरणी स्वत: तक्रारदार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकायुक्त, कामगार आयुक्त, कामगार मंत्रालयाचे प्रधान सचिव, एसीबीचे पोलिस उपअधीक्षक, पोलिस महासंचालक यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी अर्ज दाखल करुन पाठपुरावा केला. याची दखल घेवून महाराष्ट्राचे अवर सचिव शितल स. निकम यांनी दि. २१ मे २०२१ रोजी एसीबीचे अपर पोलिस अधिक्षकांना पत्रही दिले. तेव्हा चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. असे असताना आपल्याच आरोपी बनवण्यात आले असल्याचे असे शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

चौकशीत निष्पन्न
याप्रकरणी पाशुमिया शेख यांनी तक्रार दिली होती. परंतु, तक्रारदारच आरोपी होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. शेख यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. यामुळे गुन्हा दाखल केला.ते न्यायालयात दाद मागु शकतात.
प्रशांत संपते, पोलिस उपाधीक्षक, एसीबी.

३० कोटींचा घोटाळा
कामगार कार्यालयातील हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मी स्टींग ऑपरेशन केले. ३० कोटींचा हा घोटाळा आहे. मी तक्रार देऊनही माझ्यावर गुन्हा नोंद केला. मात्र, मुख्य दलाल मोकळेच सोडले. सक्षम न्यायालयात दाद मागण्याची तयारी करत आहे.
पाशाभाई शेख, तालुकाध्यक्ष, मनसे, उस्मा.

बातम्या आणखी आहेत...