आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र वैश्विक, धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी वास्तुविशारद सल्लागारांनी पहिल्या टप्प्यात एक हजार कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रारूप आराखड्यावर चर्चा झाली. आगामी पाच वर्षात मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्येत अधिक वाढ होणार आहे. त्याअनुषंगाने पायाभूत सुविधांसह भाविक-भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. या सर्व बाबींचा विचार करून विकास आरखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या सहकार्याने स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यांनी पहिल्या टप्प्याच्या कामात ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना नियोजित वेळेत दर्शन घेता येणार असून त्यांना थांबण्यासाठी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त दोन प्रतीक्षालये बांधण्याची सूचना केली. यामध्ये दुकाने, शौचालये, टीव्ही स्क्रीन, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स अशा सुविधा असेल. प्रत्यक्ष प्रवेशाच्या ठिकाणी या व्यतिरिक्त दर्शन मंडप प्रस्तावित करण्यात आले.
यात मोबाइल व पादत्राणे ठेवण्याची सुविधा,मंदिरापर्यंत जाण्यासाठी चढउतार करण्यास सोयीस्कर असलेला ७५० मीटर लांबीचा ‘रॅम्प’ उभारण्यात येणार आहे. यात आपत्कालीन मार्ग व दोन लिफ्ट समाविष्ट आहेत. दहा हजार भाविक क्षमतेचा भव्य दर्शन मंडप प्रस्तावित करण्यात आला आहे. या विकास आराखड्यानुसार काम पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर तुळजापूर येथे देशातील इतर नामवंत तीर्थस्थळी उपलब्ध सुविधा निर्माण होणार आहे. यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूर हे वैश्विक धार्मिक स्थळ म्हणून विकसित होणार असून देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढणार आहे.
भक्तांची होणारी काहिली थांबवणे आवश्यक
प्रशासनाकडून तुळजापूर देवस्थान आणि शहराचा विकास करण्यासाठी एकत्रित आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यावर पहिल्या टप्प्याचा प्रारूप आराखडाही तयार आहे. सध्या उन्हामुळे भक्तांची काहिली होत आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराबाहेरही काही सुविधा द्यावी. या सुविधेचाही आराखड्यात समावेशाची मागणी होत आहे.
दहा एकरात साकारणार शिल्प, वस्तू संग्रहालय
दहा एकर जागेत आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे शिल्प व वस्तू संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित केले. या पूर्ण जागेत बागबगिचा आणि ‘लाइट अॅन्ड साउंड शो‘ विकसित करून आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. चार प्रमुख रस्त्यांवर भव्य कमानी व मंदिर रस्त्यावर तीन कमानी प्रस्तावित आहेत.
केंद्र व राज्य सरकारसह सीएसआर फंडातून निधी
जेजुरी देवस्थानच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील एक हजार कोटींचा विकास आराखडा अंतिम करून परिपूर्ण प्रस्ताव नियोजन विभागाला सादर होणार. केंद्र व राज्य सरकारसह सीएसआर फंडातून निधीसाठी प्रयत्न राहणार , असे आमदार राणा पाटील यांनी सांगितले. बैठकीत राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी स्ट्रक्टवेलचे संचालक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.