आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या निधीसंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.४) बैठक घेण्यात आली असून, या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. एकूण निधीपैकी राज्याने पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबत तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याच्या सूचना परिवहनमंत्री श्री.परब यांनी दिल्याची माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिली आहे.
परिवहनमंत्री श्री.परब यांनी बोलावलेल्या बैठकीला रेल्वेचे मुख्य अभियंता सुधीर पटेल, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,सहसचिव राजेंद्र होळकर यांची उपस्थिती होती. मंजूर असलेल्या महत्वाच्या रेल्वेमार्गाबाबत निधीच्या बाबतीत मोठ्या अडचणी येत असल्याने याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी आमदार घाडगे-पाटील यांनी परिवहनमंत्री श्री.परब यांच्याकडे केली होती.त्यानुसार बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या माध्यमातून अनेक बाबी समाेर आल्या असून,त्यामुळे भविष्यात काेणती कार्यवाही करायची, याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सचिव यांनी उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारच्या वतीने ८ जानेवारी २०१९ रोजी पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबत रेल्वे विभागाला पत्र दिले होते. हा प्रकल्प ९०४ कोटींचा असून राज्याने त्यातील ५० टक्के वाटा उचलण्याची तयारी त्या पत्राद्वारे दाखविली होती.
मात्र नंतर कार्यवाही करणे अपेक्षित होते ते काहीच झाले नाही. पत्र दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर हा विषय येणे अत्यावश्यक होते. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी देखील गरजेची होती. तसे काहीच न झाल्याने निधीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातही केंद्र सरकारने रेल्वेमार्ग जाहीर केल्यानंतरही घोषीत होणाऱ्या सलग तीन अर्थसंकल्पात केंद्राची आर्थिक तरतूद शंभर टक्के दाखविली असल्याची बाब या बैठकीत समोर आली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्राने त्यात दुरुस्ती केली असून केंद्राचा पन्नास टक्केच वाटा दाखवला आहे. यापुढे हा रेल्वेमार्ग अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याबाबत सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. रेल्वे विभागाकडून सविस्तर प्रस्ताव घेऊन राज्य परिवहन विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत.पुढील काळात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सोबतीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.