आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ५४ गावामधील ६० हजार खातेदारासाठी राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, निराधार, वयोवृद्ध, व्यापारी, शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. सहा कर्मचाऱ्यावर कामकाजाचा भार असल्याने किरकोळ कामासाठी बँकेत गेल्यानंतर दिवस जातो. खातेदारांच्या सोईसाठी दुसरी शाखा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय बँकांच्या विलिनिकरणानंतर वाशी तालुक्याचा भार एकाच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर आला आहे. विलीनीकरणाच्या अगोदर स्टेट बँक ऑफ हैदराबादची शाखा होती. आता ही शाखा मागील काही वर्षांपूर्वी एसबीआयमध्ये विलीन झाली आहे. यामुळे आता स्टेट बँकेची एकच शाखा आहे. यामुळे व्यवस्थापन कोलमडले आहे. बँक उघडण्यापूर्वीच लांबच लांब रांगा बँकेसमोर लागत आहेत. पारदर्शक व एकछत्री आर्थिक व्यवहार होण्यासाठी केंद्र सरकारने बँकेच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतल्याने बँकांमधील पारदर्शकता वाढली असली तरी खातेदारांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. केंद्र शासनाने अद्याप बँकेच्या कर्मचाऱ्यांत वाढ करण्यासाठी ठोस पावले उचलले नाही. यामुळे सर्वच खातेदार भरडून निघत आहे. याची प्रचिती वाशी तालुक्यातील नागरिकांना येत आहे.
तालुक्यातील ५४ गावामधील सामान्यांपासून ते नोकरदा, व्यापारी, निर्धार, वयोवृद्ध, निवृत्ती वेतनधारकांचे आर्थिक व्यवहार एकाच शाखेतून होत आहेत. बँक उघडण्यापूर्वी लागलेल्या रांगेमुळे किरकोळ कामासाठी खातेदाराचा दिवस बँकेतच जातो. सर्व खातेदारांना सेवा देण्यासाठी केवळ ६ कर्मचारी आहेत, मात्र प्रत्येक व्यक्ती मर्यादित काम करत असते. नागरिकांकडून सातत्याने दुसरी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, याकडे बँक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
रात्री उशिरापर्यंत थांबतात कर्मचारी दैनंदिन व्यवहारासाठी बँकेमध्ये किमान १५०० खातेदार येत असल्याने धनादेश, आरटीजीएस, ट्रान्स्फर, आधार लिंक, मोबाइलला लिंक, इंटरनेट बँकिंगसाठी अर्ज करणाऱ्या खातेदारांची सेवा सुरू करण्यासाठी दिवसभर कर्मचाऱ्यांना वेळच मिळत नाही. कार्यालयीन कामानंतर हे कर्मचारी रात्री ९ ते १० वाजेपर्यंत बँकेत थांबून कामे उरकत आहेत.
याबाबत शाखाधिकारी सोमनाथ माने म्हणाले की, वाढीव ग्राहक सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्रात पासबुक प्रिंट आणि वाढीव कर्मचाऱ्यांसाठी वरिष्ठ स्थरावर पाठपुरावा सुरू आहे. सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मदतीने खातेदारांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वाढीव कर्मचाऱ्यांची गरज बँकेतील खातेदारांची संख्या व कर्मचाऱ्यांची संख्या याची तुलना केल्यास प्रत्येक १० हजार खातेदारामागे १ कर्मचारी असे समीकरण होत आहे. खातेदारांच्या तुलनेत कर्मचारी कमी असल्याने नेहमीच वाद होत आहेत. बँकेत निराधार, श्रावणबाळ, निवृत्ती वेतनधारकांची संख्या ४५०० एवढी आहे. तरी शेतकरी अनुदान, पीकविमा, पीक कर्ज यासाठी येणाऱ्यांची संख्याही ५ हजारापेक्षा जास्त आहे. तालुक्यात १० पेट्रोलपम्प, महावितरण, महसूल, खरेदी विक्री कार्यालय, नगरपंचायत यासह जवळपास सर्वच तालुकास्तरीय व ग्रामपंचायतींची खाती या ठिकाणी असल्याने हा सर्व डोलारा सांभाळण्यासाठी किमान २० कर्मचारी आवश्यक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.