आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:47 वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची परंपरा; कै.विलासदादा शिंदे गणेश मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांसाठी स्वतंत्र सर्वरोग आरोग्य शिबिर,वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कै.विलासदादा शिंदे गणेश मंडळाने सुमारे ४७ वर्षांपासून सामाजिक उपक्रमाची परंपरा जपली असून, यावर्षीही खास विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

शहरातील कोट गल्ली येथे तत्कालीन कामगार नेते विलासदादा शिंदे, विश्वनाथ मुंडे, नानासाहेब मगर, कमलाकर मुंडे, हरिश्चंद्र पवार, आण्णासाहेब अचलेरकर, दिलीप मालखरे, सुभाष शिंदे, इलाही तांबोळी, श्रीकांत वडगावकर, शाहूराज चव्हाण,जनार्धन डोंगे, वसंतराव जाधव,प्रकाश तोडकरी या ज्येष्ठ मंडळींनी १९७६ साली नवयुवक तरुण गणेश मंडळ या नावाने मंडळाची स्थापना केली. स्थापनेपासून या मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कामगार नेते विलासराव शिंदे यांचे २००८ साली निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंडळाचे नाव कै.विलासदादा शिंदे सार्वजनिक गणेश मंडळ असे करण्यात आले. मंडळाची श्रीविसर्जन मिरवणूक प्रसिद्ध आहे. मिरवणुकीत तरुणांसह ज्येष्ठ मंडळी पण उत्साहाने सहभागी होतात.१९९० पासून कोरोना काळातील २ वर्षे वगळता गेली ३२ वर्षे मिरवणूक काढली गेली. शहरातील निवडक गणेश मंडळांपैकी एक मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे.वर्षभर अनेक उपक्रम राबवून सातत्यपूर्ण कार्यक्रमांची परंपरा कायम ठेवणाऱ्या मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

महिला पुरूषांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबीर,नवरात्रोत्सवात भाविकांना अन्नदान आदी उपक्रम नित्यनेमाने घेण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.मिरवणुकीचे दरवर्षी वेगळेपण असते. झांज,लेझीम अशा पारंपारिक वाद्यांमध्ये निघणाऱ्या या आजवरच्या मिरवणुकीत यावर्षी ढोल-पथकाचा समावेश आहे. ५० मुले व २० मुली, अशा ७० जणांच्या पथकाची तयारी पूर्ण झाली आहे.गेल्या ३२ वर्षांपासून नवनाथ डांगे, अशोक शिंदे, बाळासाहेब मंुडे, काकासाहेब मंुडे, आनंद जाधव,सुजित अंबुरे हे मिरवणुकीचे नियोजन पाहत आहेत. तर प्रा.मोहन शिंदे यांच्यासह धनंजय मंुडे,अॅड.सारंग वडगावकर आदी तरूण पदाधिकाऱ्यांचाही नियोजनात सहभाग आहे. तब्बल ४७ वर्षे सामाजिक सलोखा जोपासत समाजाला खऱ्या अर्थाने एकत्र करून आमचे मंडळ यापुढेही अशाच पध्दतीने कार्यरत राहील,असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मुंडे, उपाध्यक्ष अरुण शिंदे, सचिव आण्णासाहेब अचलेरकर, कोषाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

मुस्लिम बांधवांचाही असतो सहभाग
गणेश मंडळाच्या वतीने शालेय मुला-मुलींसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धेसह अनेक प्रकारचे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच बरोबर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर घेतले जातात. या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळात हिंदुंसह मुस्लिम बांधवही सहभागी असतात.

बातम्या आणखी आहेत...