आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिरव्यागार लुसलुशीत शेतीने नटलेला शिवार आणि गडद लाल रंगाच्या गाजरांची पडलेली रास. हिरव्या-लाल शेतीचा भांडगावचा (ता.परंडा) शिवार पाहताक्षणी नजरेत भरतो. गावातल्या सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांच्या शेतात गाजरांची शेती उभी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला गाजरांचा पुरवठा करणाऱ्या गावातील शेतकरी अवघ्या अडीच ते तीन महिन्यांत लाखो रुपयांचा नफा मिळवितात.
बार्शीपासून १० किमीवरील भांडगावात अनेक पिढ्यांपासून गाजरांची शेती होत जाते. शेतकरी सुधीर अंधारे म्हणाले, “आमचे वडील, आजोबाही गाजर शेती करायचे, आम्हीही करतो. गावातील ७५ ते ८० टक्के शेतकरी गाजराची शेती करतात.’
बहुतांश शेतकरी बार्शी, परंडा, भूम, साेलापुरात जाऊन गाजराची हातविक्री करतात. काही शेतकरी बाजार समितीत गाजर पाठवितात. बाजार समितीतून संपूर्ण महाराष्ट्रात गाजरांची विक्री होते. वर्षात एकदा गाजर शेती केल्यानंतर अन्य पिकांसाठी शेतीचा वापर होतो.
स्वादिष्ट गाजरांची राज्यभर विक्री
ही गाजरे दिसायला तेवढी आकर्षक नाहीत. मात्र त्यात गावरानपणा टिकून आहे. गावातही एकही शेतकरी बाहेरून विकतचे बियाणे घेत नाही. स्वत:च्याच शेतात गाजराचे बंुधे कापून त्याची लागवड केली जाते. त्यापासून बिया तयार होतात. याच बिया शेतात टाकून उत्पन्न काढले जाते. सध्या हे बियाणे २५० ते ३०० रुपये किलो आहे.
एकरात एक लाखाचे उत्पन्न
एकरभर शेतीसाठी ३ ते ४ हजार रुपयांचे १२ ते १५ िकलो बियाणे लागते. शेतात हातानेच बिया विस्कटून टाकतात. चांगला रंग आल्यास गाजराला अधिकचा दर मिळतो. सध्या गाजराला ३५ ते ४० रुपये किलो किरकोळचा दर आहे. एकरामध्ये किमान १ लाख रुपये उत्पन्न मिळते.
पाण्याशिवाय, नैसर्गिक अन् सेंद्रिय गाजर शेती
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शेतीची कुळवणी केल्यानंतर शेतात बियाणे विस्कटून टाकले जाते. या शेतीला रासायनिक खत वा फवारणी किंवा खुरपणी अन् मशागतीची गरज नसते. पावसाच्याच पाण्यावर किंवा जमिनीतील ओलीवर गाजराचे पीक येते. अडीच ते तीन महिन्यांत म्हणजे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पीक काढणीला येते. त्यामुळे गाजराला चांगला दरही मिळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.