आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबादेत उपक्रम:शोभायात्रेतून राष्ट्राभिमानाचा जागर; विद्यार्थी, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातून सोमवारी काढलेल्या भव्य शाेभायात्रेतून राष्ट्राभिमानाचा जागर झाला. ढोल-ताशांच्या गजरात, उंट-घोड्यांच्या समवेत काढलेल्या दिमाखदार यात्रेत विविध जाती, धर्मातील नागरिकांसह विद्यार्थी व महिलांही सहभाग नोंदवला. प्रभू श्रीराम, राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या रथांनी शोभायात्रेची शान वाढवली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील, लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटलांच्या पुढाकारातून ही शोभायात्रा काढण्यात आली. जिजाऊ चौकातून त्यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेची सुरुवात झाली. यावेळी देशभक्तीपर गीते व भारत मातेच्या जयघोषाणे संपूर्ण परिसर दणाणला. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुमारे १० हजार विद्यार्थी ७५७५ फुट लांबीचा तिरंगा घेऊन सहभागी झाले. उंट, घोडे व दुचाकीवर स्वार पारंपारिक वेशातील महिलांचा सहभाग लक्षवेधी होता.

विविध चित्ररथांनी वेधले लक्ष
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या चित्ररथासह आदिवासी बांधवांचा देखावा व त्यांचे पारंपारिक नृत्य विलोभनीय होते. संत गोरोबा काकांच्या देखाव्याबरोबर बाल वारकरी पथकाने टाळ व मृदंगाच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय करुन टाकले. फुलांच्या सजावटीतील भारतमातेचा रथ, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथासह पारंपारिक संभळ वाद्यसमूह शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

विविध विद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
शिंदे हायस्कूल, जीवनराव गोरे विद्यालय, नूतन विद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, शरद पवार हायस्कूल, आसरा उर्दू हायस्कूल, तेरणा पब्लिक स्कूल, श्री रविशंकर हायस्कूल, आरपी कॉलेज, भारत विद्यालय, पोदार स्कूल, अभिनव स्कूल, जि.प.मुलांची शाळा, तेरणा हायस्कूल, समता विद्यालय, सरस्वती हायस्कूल, जि.प.कन्या प्रशाला, ग्रीनलॅन्ड शाळा, लाटे प्रशाला, भाई उद्धवराव पाटील शाळा, आर्य चाणक्य विद्यालय, भोसले हायस्कूल आदींनी सहभाग घेतला.

दांडपट्ट्यासह तलवारबाजी
छत्रपती शिवाजी महाराज चौकात लेडीज कल्बच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून मुंबईच्या महिलांच्या पथकाने दांडपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळ यासारखे कलाविष्कार सादर केले. महिलांनी मर्दानी खेळ साजरे करुन राष्ट्रगीताने शोभायात्रेची सांगता करण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा अभुतपूर्व भव्यदिव्य दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हवेत तिरंगी फुगे सोडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...